सिंधुदुर्ग- कोलझरमध्ये अजगराने खुराड्यात घुसून कोंबड्या आणि दोन अंडी फस्त केल्या आणि नंतर त्याने तिथेच ताणून दिले. आठ फुटाचा अजगर पाहून नागरिकांमध्ये दहशत पसरली. नंतर हा अजगर पकडून वनखात्याच्या ताब्यात देण्यात आला.
भक्ष्याच्या शोधात आलेल्या अजगराने फस्त केल्या दोन कोंबड्या अन् अंडी, खुराड्यातच दिले ताणून पावसाळा सुरू झाल्याने भक्ष्यासाठी वस्तीत अजगर घुसण्याचे प्रकार वाढले आहेत. येथील दीपक पास्ते यांच्या घराजवळच्या खुराड्यात आज पहाटे अजगर घुसला. त्याने दोन कोंबड्या आणि आत असलेली अंडी फस्त केली; मात्र सुस्तावल्याने तो आतच पडून राहिला. सकाळी पास्ते यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी स्थानिकांना याची कल्पना दिली.
महादेव नाईक आणि रोशन नाईक यांनी मोठ्या शिताफिने या अजगराला पकडले. कोंबड्या खाल्ल्याने त्याचे पोट भरले होते. या प्रकाराची माहिती वन कर्मचार्यांना देण्यात आली. काही वेळातच वनरक्षक कोल्हे दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत तेजस देसाई, अवधुत महाजन, विष्णू नाईक, सत्यवान नाईक आदींनी त्याला नैसर्गिक अधिवासात नेले.
तेथे सोडले असता त्याने गिळलेले भक्ष्य बाहेर काढायला सुरवात केली. सगळ्यात आधी अख्खे अंडे व त्या पाठोपाठ कोंबडी बाहेर आली. सुमारे आठ फूट लांब असलेल्या या अजगराने दोन कोंबड्या गिळल्या होत्या.