सिंधुदुर्ग - मालवण येथील मत्स्यव्यवसाय विभागाच्या कार्यालयातील सहाय्यक मत्स्य आयुक्त प्रदीप वस्त आणि परवाना अधिकारी शिवराज चव्हाण या दोघांना लाचलुचपत विभागाने २ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. यातील सहाय्यक मस्य व्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त यांच्या कारभाराबाबत व्यवसायिकांमध्ये नाराजी होती. या नाराजीतूनच २ वर्षांपूर्वी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनाला 'बांगडा फेक आंदोलना'चे वळण लागले होते. तर, या कारवाईमुळे मस्यव्यवसाय विभागातील भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.
शुक्रवारी रात्री मत्स्यव्यवसाय खात्याच्या गस्ती नौकेवर कर्तव्यावर असलेल्या सहाय्यक आयुक्त प्रदीप वस्त आणि परवाना अधिकारी शिवराज चव्हाण यांनी मासेमारी करताना मिळून आलेल्या पर्ससीन नौकेला पकडले. नंतर नौकेला सोडण्याकरता त्यांनी नौकामालकाकडे ५ लाख रुपयांची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास नौका जप्त करण्याची धमकी देत पैसे शनिवारी कार्यालयात घेऊन येण्यास सांगितले होते.