सातारा -पाटण तालुक्यातील नावडी गावामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एक महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे. शांताबाई सोमु जाधव (65) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्यांच्यावर कराडच्या उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पाटण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शांताबाई या बुधवारी सायंकाळच्या सुमारास शेळ्या घेऊन बांधावर गेल्या होत्या. तेथून येताना जवळच दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्याजवळ असलेल्या शेळीला पकडण्यासाठी त्यांच्या दिशेने उडी मारली. यावेळी, बिबट्याचा पंजा शांताबाईंच्या डोक्याला लागल्यामुळे त्या जखमी झाल्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी कराडच्या वेणुताई उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच परिक्षेत्र वन अधिकारी विलास काळे, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे हे तातडीने रूग्णालयात आले. त्यांनी जखमी महिलेकडून माहिती घटनेची अधिक माहिती घेतली. दरम्यान, शांताबाई यांच्या अंगावर उडी पडल्याने गांगारून बिबट्याही पळून गेला, त्यामुळे या हल्ल्यात शेळी बचावली.