महाराष्ट्र

maharashtra

सातारा : पतीस पेटवून देणाऱ्या पत्नीला अडीच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

By

Published : Jul 22, 2020, 3:34 PM IST

पतीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नीने पतीच्या अंगावर पेट्रोल टाकत त्याला पेटवून दिले होते. यात पतीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आरोपी पत्नीस अडीच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

file photo
file photo

कराड (सातारा) - अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यास पेटवून देणाऱ्या पत्नीस सदोष मनुष्यवधाच्या आरोपान्वये दोषी धरून कराड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. ए. ए.आर. औटी यांनी अडीच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. सीता बाळू रोकडे (रा. रिसवड, ता. पाटण), असे शिक्षा झालेल्या आरोपी महिलेचे नाव आहे.

पतीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत होती. दि. 20 डिसेंबर, 2017 ला सकाळी त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी मोटर सायकलीसाठी घरात आणून ठेवलेले पेट्रोल पत्नी सीता हिने नवरा बाळू संपत रोकडे याच्या अंगावर ओतून त्याला पेटवून दिले होते. त्यात गंभीररित्या भाजल्याने पतीचा मृत्यू झाला होता.

याप्रकरणी कोयना नगर पोलीस ठाण्यात पत्नीवर गुन्हा दाखल झाला होता. कोयनानगरचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

या खटल्याची अंतिम सुनावणी बुधवारी (दि. 22 जुलै) झाली. कराड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. ए. ए. आर. औटी यांनी आरोपीस सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली दोषी धरून अडीच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे 9 साक्षीदार तपासण्यात आले. सहाय्यक जिल्हा सरकारी वकील अ‌ॅड. मिलींद कुलकर्णी यांनी केलेला युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरत ही शिक्षा ठोठावली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details