सातारा - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार आणि पावसाची संततधार सुरूच असून शिवाजीसागर जलाशयात पाण्याची आवक प्रचंड वाढली आहे. सोमवारी सकाळी प्रतिसेकंद 1 लाख 14 हजार 980 क्युसेक्सवर पाण्याची आवक पोहोचल्याने जलपातळी नियंत्रित राखण्यासाठी रविवारपासून 10 फुटावर उचलण्यात आलेले कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे सोमवारीही 'जैसे थे' स्थिर ठेवण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला आहे.
कोयना नदीवरील 'या' पुलांना मिळाली जलसमाधी; अनेक गावांचा तुटला संपर्क - satara flood news
गेल्या आठवड्यापासून कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने कोयना धरणात सध्या 92.81 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ 12 टीएमसी पाण्याची गरज आहे. पाणलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढू लागल्याने धरणातील निर्धारित पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी दरवाजे खुले करण्यात आले आहेत.
कोयना नदीपात्रात सुरू असलेला पाण्याचा विसर्ग प्रतिसेकंद 2 हजार क्यूसेक्सने वाढवून हा विसर्ग प्रतिसेकंद 56 हजार 431 क्युसेक इतका करण्यात आला आहे. त्यामुळे कोयना नदीवरील मेंढेघर, नेरळे, जुना संगमनगर धक्का पूल, मूळगाव आणि निसरे फरशी पूल पाण्याखाली गेल्याने नदीपलीकडील गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासनाने कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, हवामान खात्याने येत्या चार दिवसांत 20 तारखेपर्यंत पुणे, कोकणसह सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीच्या इशारा दिल्याने सातारा जिल्ह्यात 'रेडअलर्ट' जारी केला आहे.
कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग आणि मुसळधार पाऊस यामुळे कोयना, केरासह सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असून काही ठिकाणी कोयना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अतिवृष्टीला सुरवात झाल्यास कोयना आणि कृष्णा या नद्यांच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ होऊन या नद्याकाठच्या गावांना धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी पाटण, कराड आणि सांगली परिसरातील कोयना आणि कृष्णा काठच्या गावांत महापुराचा धोका वाढला आहे. परिणामी या परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
त्यानुसार कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद 56 हजार 431 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायमच असल्याने धरणाचे दरवाजे टप्प्याटप्प्याने वाढविण्यास सुरवात करून धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्याचा प्रयत्न कोयना सिंचन विभाग करत आहे. तरीही पावसाचा जोर अधिकच वाढत असल्याने कोयना धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात कमी जास्त होत आहे. त्यामुळे कोयना प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागत आहे.
दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रासहीत संपूर्ण पाटण तालुक्यात संततधार मुसळधार पाऊस कोसळत असल्याने आणि धरणातून सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग यामुळे कोयना नदी दुथडी भरून वाहत आहे. पाण्याचा फुगवटा ओढ्यांच्या माध्यमातून पाटण शहरात आल्याने पाटण शहरातील नवीन बसस्थानक परिसर, धांडे पूल परिसरात पुराचे पाणी शिरले आहे. परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. दुकानात पाणी शिरल्याने दुकानातील साहित्य हलविण्याची तारांबळ उडाली आहे. तर शहराची स्मशानभूमी आणि परिसरातील भात गिरणीही पाण्याखाली गेलेली आहे. शहरातील मार्केट यार्ड परिसरातील काही घरांच्या उंबरठ्याला पाणी लागल्याने तेथील 13 लोकांना पाटण नगरपंचायतीमार्फत कै. ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूलमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे.