सातारा - पिठाची गिरणी काढता न आलेले माजी मुख्यमंत्री विकासाचा डांगोरा पिटत आहेत. हे लादलेले नेतृत्व वटवाघुळाप्रमाणे आहे. पाय दिल्लीत आणि डोकं महाराष्ट्रात, अशी त्यांची अवस्था असल्याची टीका माजी सहकार मंत्री विलास पाटील-उंडाळकर यांनी पृथ्वीराज चव्हाणांवर केली. कराड दक्षिणमधील रयत संघटनेचे अपक्ष उमेदवार अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
पृथ्वीराज चव्हाण यांचे कुटुंब अनेक वर्षे सत्तेत आहे. त्यांच्या आई-वडिलांनी दिल्लीत बसून यशवंतराव चव्हाणांचा द्वेष केला आणि या महाशयांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होताच यशवंतराव चव्हाणांनी रुजवलेली राजकीय-सामाजिक संस्कृतीच उद्ध्वस्त करून टाकली, अशा वरून लादलेल्या उमेदवाराचा जनतेनेच पराभव करावा, असे ते म्हणाले.
हे वाचलं का? - मोदींनी ५ वर्षांत जे देशाचे नुकसान केले, ते काँग्रेसने कधीच केले नाही - राहुल गांधी
मतपेटीद्वारे नवीन राज्यकर्ते निर्माण होतात. मताची विक्री करून आपण पैसेवाल्या मंडळींना सत्तेत पाठवू लागलो, तर सामान्य माणूस राज्यकर्ता कसा बनणार? असा सवाल विलास उंडाळकरांनी केला. प्रामाणिक निष्ठावंत व श्रमजीवी लोकांनी 1980 प्रमाणे या निवडणुकीत परिवर्तनाला साथ द्यावी, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. मी गेली 35 वर्ष या मतदार संघात रचनात्मक विकास केला. आताचे पुढारी फक्त पोस्टर पुढारी बनले आहेत. त्यांच्या बॅनरवरील निधीचे आकडे ही शुद्ध राजकीय बुवाबाजी असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
हे वाचलं का? -'पूर्वी इंग्रज देशाला लुटायचे; आता भाजप गरिबांचा पैसा लुटून श्रीमंताला वाटतोय'
गेली ५ वर्षे विरोधक जनतेला विकासकामांच्या भूलथापा देत आहेत. अनेक वर्षे त्यांच्याकडे सत्ता होती. त्या काळात त्यांनी फक्त ठरावीक कुटुंबांचाच विकास केला. विलास यांनी 35 वर्ष मतदार संघाचा विकास केलाच. शिवाय शेकडो कार्यकर्त्यांना सत्तेत स्थान दिले. निवडणुका लागल्या की बेरोजगारीचे भांडवल करून युवकांना फसवण्याचे उद्योग सुरू होतात. युवकांना शाश्वत काम दिले, तर मी त्यांचे स्वागतच करेन. मात्र, निवडणुकांच्या काळात युवकांची फसवणूक करणे, हाच विरोधातील भाजप उमेदवाराचा अजेंडा राहिला आहे. भूलभुलैय्या करणार्या पुढार्यांवर युवकांनी विश्वास ठेवू नका. निवडणुकीपुरताच स्वार्थ ठेवणार्यांना निवडणुका झाल्यानंतर जनतेशी घेणे-देणे नसते, असेही उदयसिंह पाटील म्हणाले.
हे वाचलं का? -चंद्रकांत पाटलांच्यात दम होता, तर 'तेथे' का हिसका दाखवला नाही
नईम कागदी म्हणाले, विरोधी दोन्ही उमेदवार हे श्रीमंतांचे पुढारी आहेत. त्यांना गरिबांशी देणे-घेणे नाही. कराड, मलकापूर कुठेही कमी पडणार नाही. अफवांवर विश्वास न ठेवता काम करा. विजय आणि गुलाल आपलाच आहे. कृष्णा साखर कारखाना, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट, शिक्षण संस्थांमधील डोनेशनच्या पैशाचा वापर विरोधक निवडणुकीत करतात, असा आरोप माजी सभापती रमेश देशमुख यांनी केला. यावेळी कॅप्टन बाबुराव कराळे, पंचायत समितीच्या सभापती फरिदा इनामदार, माजी सभापती आप्पासाहेब गरूड, प्रदीप पाटील, प्रा. धनाजीराव काटकर, पंचायत समिती सदस्य रमेश देशमुख आदी उपस्थित होते.