कराड (सातारा) - खटाव तालुक्यातील उंबर्डे परिसरात बैलगाडी शर्यत आयोजित करणार्यांवर वडूज पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी शर्यतीच्या बैलगाड्यांसह शर्यतीसाठी आलेल्या लोकांच्या आलिशान गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. याशिवाय पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बैलगाड्यांच्या शर्यतीवर बंदी आहे. तरीही बैलगाड्या शर्यतीच्या शौकिनांकडून मोठी बक्षिसे जाहीर करून बैलगाड्यांच्या शर्यतीचे ग्रामीण भागात आयोजन केले जात आहे. कोरोनामुळे यंदा यात्रा-जत्रा रद्द झाल्या. करमणुकीसह कुस्ती फड, बैलगाड्यांच्या शर्यतीही रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे शर्यत शौकीन नाराज आहेत. परंतु, चोरी-छुपे बैलगाड्यांच्या शर्यतीचे आयोजन केले जात आहे. पोलिसांचीही त्यांच्यावर करडी नजर आहे. खटाव तालुक्यातील उंबर्डे परिसरात बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मिळताच वडूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी बैलगाडी शर्यतीच्या आयोजकांची तारांबळ उडाली.
मुंबईहून काही शर्यत शौकीनही अलिशान गाड्यांमधून आले होते. तसेच स्थानिक लोकांनी या शर्यतीचे आयोजन केल्याची कुणकुण पोलिसांना होती. याबाबत वडूज पोलिसांत सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बैलगाड्या आणि शर्यतीसाठी आलेल्या शौकिनांच्या अलिशान गाड्याच्या ठाण्याच्या आवारात आणून लावल्या आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांच्या मार्गदर्शनखाली ही कारवाई करण्यात आली आहे.