कराड (सातारा) - कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री दिवंगत विलासकाका उंडाळकर यांच्या उंडाळे गावातील सहकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक तब्बल ७५ वर्षांनी झाली. सातारा जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत विलासकाका उंडाळकरांचे सुपूत्र अॅड. उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने त्यांचे चुलत बंधू आनंदराव उर्फ राजाभाऊ पाटील यांच्या पॅनेलचा सुमारे दोनशे मतांच्या फरकाने धुव्वा उडविला.
स्थापनेनंतर प्रथमच झाली निवडणूक - उंडाळे विकास सोसायटीची स्थापना दि. ६ सप्टेंबर १९४७ मध्ये झाली. त्यानंतर गेल्या ७५ वर्षात एकदाही सोसायटीची निवडणूक झालेली नव्हती. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री दिवंगत विलासकाका उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व निवडणुका बिनविरोध होत होत्या. विलासकाका हे या सोसायटीचे सभासद होते. जिल्हा बँक निवडणुकीसाठी सोसायटीचा ठराव विलासकाका उंडाळकर यांच्याच नावे केला जायचा. ते सलग ५५ वर्षे या सोसायटीचे सभासद आणि सातारा जिल्हा बँकेचे संचालक होते.
कुटुंबात फूट पडल्याने लागली निवडणूक -उंडाळकर कुटुंबात राजकीय कारणाने फूट पडली आहे. उंडाळकरांचे पूत्र अॅड. उदयसिंह पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्यानंतर उंडाळकर कुटुंबातील राजकीय दरी आणखी रूंदावली. उंडाळकरांचे पुतणे अॅड. आनंदराव उर्फ राजाभाऊ पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा केला. दीड वर्षापुर्वी विलासकाकांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात जाहीर झालेली उंडाळे सोसायटीची निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. त्यामुळे सोसायटीची निवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा खंडित झाली. या निवडणुकीत विलासकाकांचे सुपूत्र आणि जिल्हा परिषद सदस्य अॅड. उदयसिंह पाटील यांच्या पॅनेलने चुलत बंधू अॅड. आनंदराव उर्फ राजाभाऊ पाटील यांचा आणि त्यांच्या पॅनेलचा दारूण पराभव केला.
चुलत बंधूंमधील संघर्षाकडे लागून होते जिल्ह्याचे लक्ष -अॅड. उदयसिंह पाटील आणि अॅड. आनंदराव उर्फ राजाभाऊ पाटील या चुलत बंधूंची पॅनेल आमनेसामने होती. मातब्बर राजकीय कुटुंबातील या संघर्षाकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून होते. या राजकीय संघर्षात अखेर विलासकाका उंडाळकर यांच्या सुपूत्राने बाजी मारत चुलत बंधू आणि त्यांच्या पॅनेलचा धुव्वा उडविला. उदयसिंह पाटील यांना सर्वाधिक ३४१ मते तर चुलत बंधू आनंदराव उर्फ राजाभाऊ पाटील यांना १५३ मते मिळाली. विजयी पॅनेलमधील सर्व उमेदवार सुमारे दोनशे मतांच्या फरकाने विजयी झाले.
हेही वाचा -Mohan Bhagwat : 'भारताच्या विकासात सिंधी समाजाचा अतिशय मोलाचा वाटा, देशात सिंधी विद्यापीठ व्हावे'