महाराष्ट्र

maharashtra

नोंदणीकृत फेरीवाल्यांना सातारा पालिका देणार 2500 रुपये, उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंना चिमटा

By

Published : Apr 17, 2021, 2:59 PM IST

साताऱ्यातील नोंदणीकृत फेरीवाल्यांना प्रत्येकी अडीच हजार रुपये दिलासा निधी देण्याची घोषणा सत्तारुढ सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.

Satara
Satara

सातारा - लाॅकडाऊनमुळे फेरीवाले अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे पालिकेच्या स्व: निधीतून एक हजार रुपयांची भर घालत साताऱ्यातील नोंदणीकृत फेरीवाल्यांना प्रत्येकी 2500 रुपये दिलासा निधी देण्याची घोषणा सत्तारुढ सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. अकारण संभ्रम निर्माण होण्यास हातभार न लावता, आवश्यक तेथे संबंधितांनी प्रशासनास सहकार्य करावे, अशा शब्दात उदयनराजे यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंना चिमटा काढला आहे.

पालिकेत दोन्ही बंधू विरोधात -

पालिकेने साताऱ्यातील फेरीवाल्यांची नोंदणी करून परवाने दिले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 1500 रुपयांच्या पॅकेजपासून फेरीवाले वंचित राहतील. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी पालिकेने तातडीने त्यांची नोंदणी करून परवाने द्यावेत, अशी अपेक्षावजा सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काल (17 एप्रिल) पालिका प्रशासनाला उद्देशून केली होती. त्यावर खासदार उदयनराजे यांनी लगोलग प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपली भुमिका स्पष्ट केली आहे. हे दोन्ही नेते सध्या भाजपमध्ये आहेत. तरी उदयनराजे यांची सातारा पालिकेत विकास आघाडी सत्तेत तर त्यांचे चुलत बंधू आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या नेतृत्वाखालील नगरविकास आघाडी विरोधात आहे.

फेरीवाल्यांसाठी पालिकेचे जादा योगदान-

खासदार उदयनराजेंनी प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय, की "सातारा पालिका व फेरीवाला संघटना यांच्या संयुक्त सर्वेक्षणात शहरातील 1 हजार 621 पथविक्रेत्यांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेमधून 2020-21मध्ये 754 पथविक्रेत्यांच्या खात्यात 10 हजारांची रक्कम थेट जमा करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त 867 फेरीवाल्यांची प्रकरणे मंजूर असून, रक्कम प्रदान करण्याच्या प्रक्रियेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली 1500ची फेरीवाला मदत पात्र फेरीवाल्यांना देण्यात कोणतीही अडचण नाही. शासनाच्या निर्देशांनुसार फेरीवाल्यांना 1500ची नुकसान रक्कम सातारा नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रदान केली जाईल. शिवाय त्यात पालिका प्रत्येकी एक हजार रुपयांची भर घालणार आहे."

'साविआ' कमी पडणार नाही-

'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रसंगी सातारा विकास आघाडी व्यक्तीगत स्तरावरुन देखील शासन घोषणेप्रमाणे आर्थिक मदत देईल. फेरीवाल्यांप्रती सहानुभुतीमुळे टीका करणाऱ्यांनी याबाबत थोडीतरी माहिती घेतली असती तर वस्तुस्थिती समजली असती. सध्याच्या कोरोनाच्या भीषण परिस्थितीत अकारण संभ्रमावस्था निर्माण होण्यास हातभार लावू नये. फेरीवाल्यांसह गोरगरिब नागरिक आमच्या कुटुंबातील सदस्य आहेत. त्यामुळे पात्र फेरीवाल्यांना लाभ देण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही', असेही उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details