सातारा - लोकांनी आमच्या सांगण्यावरून घड्याळाला मतदान केलं, तुमचा पुतण्या लघुशंकेची भाषा करतो आणि तुम्ही त्यावर पांघरूण घालता, राज्य सहकारी बँकेत 25 हजार कोटी रूपयांचा घोटाळा होतो आणि तुम्ही भ्रष्टाचार्यांची पाठराखण करता या सगळ्यात आमची चूक होती का, असे सवाल उदयनराजे भोसले यांनी नी शरद पवारांना जाहीर सभेत केले आहेत. आमच्याकडून चुका घडल्या असतील परंतु, आम्ही कधीही कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही, असा घणाघात उदयनराजेंनी केला आहे. कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्या प्रचाराची सांगता कराड तालुक्यातील मसूर येथे झाली. त्यावेळी उदयनराजे बोलत होते.
कराड उत्तरचा भावी आमदार हा धैर्यशील कदमच असतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उदयनराजे म्हणाले, 370 कलमाला विरोध करून तुम्ही शहिदांच्या जखमांवर मीठ चोळले. सातारचे पाणी बारामतीला वळविले. केंद्रात अटलबिहारी वाजपेयींचे सरकार एका मताने पाडले. अनेक वर्षे मराठा आरक्षणाची फरपट केली. तुमच्या माणसांनी भ्रष्टाचार करून राज्य सहकारी बँक रसातळाला नेली. यामध्ये आमची चूक होती की जनतेची चुक होती याचा जबाब शरद पवार यांनी सर्वांसमोर द्यावा. आम्ही खर्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणतो, असेही उदयनराजे म्हणाले. पवारसाहेब तुम्ही उभे राहणार असाल तर मी निवडणूक लढविणार नाही, अशी भूमिका मी घेतली होती. तुमच्यासारख्या ज्येष्ठांचा मी नेहमीच आदर केला आणि यापुढेही करेन. कौरवांची साथ सोडून पांडवांमध्ये सहभागी झालो. लबाडांची साथसंगत सोडली, यात आमची काय चूक होती ते तुम्ही सांगा, असा उपरोधिक सवालही त्यांनी केला.