महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Udayanraje Bhosale : छत्रपतींकडे बोट दाखवणार्‍यांना शाहिस्तेखानासारखी अद्दल घडवावी लागेल; खासदार उदयनराजेंचा इशारा - Udayan Raje letter warning

खासदार उदयनराजेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना उद्देशून लिहिलेले पत्रात म्हटले आहे की, एकीचा ध्यास असल्याशिवाय चुकीचा इतिहास मिटवता येत नाही. विकृत माथी कायमची वठणीवर आणायची असून आपल्याकडे बोट दाखवणार्‍यांना शाहिस्तेखानासारखी कायमची अद्दल घडवावी लागेल. तसेच आम्ही वचन देतो की, कोणत्याही महापुरूषाचा अवमान आता सहन केला जाणार नाही, अशा निर्वाणीच्या भाषेत उदयनराजेंनी पत्रात ( Udayan Raje letter ) आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Dec 3, 2022, 8:40 PM IST

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणार्‍यांचा रायगडावरील निर्धार शिवसन्मानाचा या कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले यांनी समाचार घेतला. याच निमित्ताने उदयनराजेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना उद्देशून लिहिलेले पत्र समोर आले आहे. एकीचा ध्यास असल्याशिवाय चुकीचा इतिहास मिटवता येत नाही. विकृत माथी कायमची वठणीवर आणायची आहेत. आपल्याकडे बोट दाखवणार्‍यांना शाहिस्तेखानासारखी कायमची अद्दल घडवावी लागेल. ती वेळ येऊन ठेपली आहे, असा इशारा उदयनराजेंनी पत्राच्या ( Udayan Raje letter ) माध्यमातून दिला आहे.

उदयनराजेंनी पत्रात काय म्हटलंय - इतक्या वर्षात आम्हाला आपल्याकडे वेदना मांडण्याची वेळ आली नाही. आपण निर्माण केलेले स्वराज्य म्हणजेच महाराष्ट्र आणि समस्त हिंदुस्थान आपण घालून दिलेल्या आदर्शांवर चालवला जात होता किंवा तसा आभास तरी होत होता. अलिकडच्या काळात विचारांचा कडेलोट होण्याची परिस्थिती उद्भवतेय की काय, अशी भिती मनात निर्माण झाली. अठरा पगड जाती आणि बलुतेदारांना घेऊन निर्माण केलेल्या स्वराज्याची शकले होणार की काय, या विचाराने मन विषण्ण झाले. सगळं दिशाहीन झालंय. व्यथा मांडायची कुठं? म्हणून आपल्या चरणांशी नतमस्तक होण्यासाठी आलोय, असे उदयनराजेंनी पत्राात म्हटले आहे.

उदयनराजेंचा इशारा - टाळू भरताना सटकून डोक्यावर पडलेली मंडळी आपल्याबद्दल चुकीच्या बाबी प्रचलित करण्याचा प्रयत्न करतात. विचार, भाषा आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखालील ही विकृती आहे. हे स्वातंत्र्य नाही तर स्वैराचार आहे. मनाला वाटेल तसं आणि मनात येईल तसे वागेन, असे जर कोणी म्हणत असेल तर त्याची नांगी जिरवावीच लागेल. हा आपल्यासारख्या विश्वाचं दैवत असलेल्या छत्रपतींचा मुद्दा आहे. यात तडजोड नाही, अशा शब्दांत उदयनराजेंनी गर्भित इशारा दिला आहे.

अवमान सहन केला जाणार नाही - कोणत्याही गटा-तटाचा असो, जो कोणी आपला मावळा असेल तो आपल्यासाठी एकत्र येणारच. या मावळ्यांचा जो निर्णय असेल तो शिरसावंद्य असेल. यापुढे आपल्याबद्दल एक वाक्यच नव्हे तर शब्द जरी चुकीचा बोलायची हिंमत केली तर आम्ही त्याचा मुलाहिजा ठेवणार नाही. उठसूठ आपली कोणाशीही तुलना तुलना करणार्‍यांना इतिहासाचा धडा शिकवावाच लागणार आहे. आपल्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत कोणत्याच महापुरूषांचा अवमान सहन केला जाणार नाही, असे आम्ही वचन देतो, असे उदयनराजेंनी पत्रात म्हटले आहे.


शिवद्रोह्यांना कठोर शिक्षा करण्याची वेळ - विकृत लोकांशी कसे वागायचे हे आम्हाला माहिती आहे. परंतु, इथे काही विकृत माथी आहेत. ती कायमची वठणीवर आणायची आहेत. वारंवार आपल्याकडे बोट दाखविणार्‍यांना शाहिस्तेखानासारखी कायमची अद्दल घडवावी लागणार आहे. आपल्या माणसावर वार करायचा नसतो, पण शिवद्रोह होत असेल तर त्यांना कठोर शासन करण्याची वेळ आली आहे. आम्ही वचन देतो की, कोणत्याही महापुरूषाचा अवमान आता सहन केला जाणार नाही, अशा निर्वाणीच्या भाषेत उदयनराजेंनी पत्रात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details