सातारा - दिवसेंदिवस सातारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असल्याचे दिसत आहे. आरोग्य विभागाकडून काल (शनिवार) रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 94 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 1 हजार 695 झाली आहे. तर उपचार घेऊन बरे झालेल्या नागरिकांनी 1 हजारांचा आकडा ओलांडला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेले रुग्ण हे जावळी, खंडाळा, कोरेगाव, कराड, पाटण, माण, वाई, सातारा व फलटण या तालुक्यातील आहेत. तर दुसऱ्या बाजूला जिल्ह्यात विविध रुग्णालये आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 60 नागरिकांना 10 दिवसांनंतर घरी सोडण्यात आले. खंडाळा, सातारा, पाटण, कराड, खटाव व वाई तालुक्यातील हे सगळे आहेत.