कराड (सातारा) - वाघ आणि बिबट्याच्या नखांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना विभागाने सापळा रचून पकडले. वाघनखाचे 1 लॉकेट आणि बिबट्याची 10 नखे, अशी एकूण 11 नखे जप्त करून दोघांना अटक करण्यात आली आहे. दिनेश बाबूलालजी रावल (रा. सोमवार पेठ) आणि अनुप अरुण रेवणकर (रा. रविवार पेठ, कराड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक केलेल्यांचा आंतरराज्य टोळीत सहभाग असावा, असा वनविभागाला संशय आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील अशा प्रकारची ही पहिलीच मोठी कारवाई आहे.
माहिती देताना मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे हेही वाचा -जागतिक वारसा स्थळ असलेल्या कासचं पाणी नितळ कसे? पर्यावरण तज्ज्ञांनी केला 'हा' खुलासा
कराडच्या कृष्णा नाका परिसरात दोन संशयीत वाघ आणि बिबट्याच्या नखांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोचे सदस्य रोहन भाटे आणि वन अधिकार्यांना मिळाली. त्यानुसार वनविभागाच्या अधिकार्यांनी सावित्री कॉर्नर बिल्डींग परिसरात सापळा रचला होता. बिल्डींगमधील सखी लेडीज शॉपीमध्ये दिनेश बाबूलालजी रावल हा दोन नखे विक्रीसाठी घेऊन आला. वन अधिकार्यांनी त्याला झडप घालून पकडले. त्याला घेऊन लगेच दुसरा आरोपी अनुप रेवणकर याच्या रविवार पेठेतील मयूर गोल्ड या दुकानावर धाड टाकली. रेवणकर याच्या जवळ 8 नखे सापडलीत. झडतीवेळी आरोपीच्या गळ्यातील लॉकेटमध्ये एक वाघ नख सापडले. एकूण 11 नखे जप्त करून आरोपींना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची वन कोठडी दिली आहे.
उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे, वनक्षेत्रपाल तुषार नवले, वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो मुंबईचे निरीक्षक आदीमाल्लूय्या, मानद वन्यजीव रक्षक तथा अपराध नियंत्रण ब्युरोचे सदस्य रोहन भाटे, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या स्पेशल सेलचे वनरक्षक आकाश सारडा, वनपाल आनंदा सवाखंडे, वनरक्षक रमेश जाधवर, अरुण सोळंकी, संजय लोखंडे, प्रशांत मोहिते, अशोक मलप, साधना राठोड, मंगेश वंजारे, बाबुराव कदम, भारत खटावकर, सचिन खंडागळे, राजकुमार मोसलगी, राम शेळके यांनी ही कारवाई केली.
वन्यप्राण्यांच्या नखांचे लॉकेट घालणे हा गुन्हा - भाटे
वन्यप्राण्यांची शिकार करणे हा जसा गुन्हा आहे. त्याप्रमाणे वाघ अथवा बिबट्यासारख्या वन्यप्राण्यांची शिकार करून त्यांची नखे, दातांचे लॉकेट करून गळ्यात घालणे हा देखील दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 नुसार शेड्युल 1 मध्ये वाघ व बिबट्या या प्राण्यांना उच्च दर्जाचे संरक्षण दिलेले आहे. जर कोणाकडे वाघ, बिबट्याच्या नखांचे लॉकेट असेल अथवा कोणी शिकार करत असेल तर गोपनीय माहिती 9422004800 या क्रमांकावर कळवावी. संबंधिताचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन मानद वन्यजीव रक्षक तथा अपराध नियंत्रण ब्युरोचे सदस्य रोहन भाटे यांनी केले.
हेही वाचा -कुस्तीचा जादूगार : ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव मरणोत्तर पद्म पुरस्कारापासून वंचित