महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साताऱ्यातील नरवणे गावात १६४ वर्षांपासुन 'एक गाव एक गणपती' परंपरा - ganesha festival

मिरवणुकीत दर्शनासह भारुडी भजनाने संपूर्ण रात्र जागविली जाते. पहाटे गणेश विसर्जन केले जाते. नेमक्या कारणासाठी व योग्य पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणारे आणि गावात एकही गणेश मंडळ नसणारे गाव म्हणून नरवणेची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. सर्व जातीधर्माच्या लोकांचा समावेश इथल्या यात्रा कमिटीत असून येथील हिंदू मुस्लिम ऐक्यासह सामाजिक सलोखा घट्टपणे टिकून आहे.

साताऱ्यातील नरवणे गावात १६४ वर्षांपासुन 'एक गाव एक गणपती' परंपरा

By

Published : Sep 8, 2019, 2:24 AM IST

सातारा -सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी शासनाने 'एक गाव, एक गणपती' व इकोफ्रेंडली गणेश मूर्तीचा आग्रह धरला आहे. मात्र, तब्बल 164 वर्षापासून 'एक गाव, एक गणपती'ची परंपरा जोपासत सर्वधर्म समभावातून एकीचा नारा माण तालुक्यातील नरवणेकरांकडून दिला जात आहे. यंदाही टाळ मृदुंगाच्या गजरात श्रींचे सर्वेश्वर मंदिरात आगमन झाले.

साताऱ्यातील नरवणे गावात १६४ वर्षांपासुन 'एक गाव एक गणपती' परंपरा

हेही वाचा - परभणी गणेश दर्शन खास तुमच्यासाठी; बघा सामाजिक, पर्यावरणीय संदेश देणारे देखावे...

शासनाकडून या उपक्रमाला प्रोत्साहन मिळण्याची गरज आहे. पूर्वी नारायणदेवाचे मंदिर असल्याने या भागाला नारायणवन म्हणून ओळखले जात असे यारूनच नरवण व पुढे नरवणे असे गाव नाव पडले. पूर्वीपासूनच अध्यात्म व वारकरी संप्रदायाचे वलय असलेल्या नरवणेत अनेक संत, महात्म्यांचा वास झालेला आहे. हा वारसा आजही येथील लोकांनी जपल्याचे पाहायला मिळते. याच नरवणेकरांनी एक गाव एक गणपती ची परंपरा देखील तब्बल १६४ वर्षे अखंडीतपणे जोपासली आहे. गावातील लोक एकदिलाने एकत्रित यावेत, जातीभेद टाळावा या उद्देशानेच १८५५ च्या सुमारास हा उत्सव सुरू करण्यात आल्याचे ग्रामस्थ सांगतात. ही परंपरा आजही येथे मोठ्या भक्तिभावाने जपली जात आहे.

हेही वाचा - मुंबईमध्ये भर पावसात गणरायाला निरोप; 32 हजार मूर्तींचे विसर्जन

गावाच्या मध्यवर्ती भागात सर्वेश्वर मंदिर असून विविध देवतांसह श्री गणेशमूर्ती देखील या मंदिरात आहे.भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने नवसाला पावणारा गणपती म्हणून येथील गणेशाची महती आहे. गणेशोत्सवानिमित्त दरवर्षी मोठ्या उत्साहाने यात्रा भरणारे महाराष्ट्रातील नरवणे हे बहुदा एकमेव गाव असावे. एक गाव एक गणपती उपक्रमाबरोबरच पर्यावरणातील प्रदूषण रोखण्यासाठी इकोफ्रेंडली गणेशमूर्तीचा आग्रह अलीकडच्या काही वर्षात शासनाने धरला आहे. त्यासाठी विविध बक्षीस योजना देखील राबवून लोकांना व गावांना प्रोत्साहित केले जात आहे. नरवणेत मात्र सुरुवातीपासून स्थानिक कुंभारांकडूनच मातीची एकच भरीव गणेशमूर्ती बनवली जाते. गावातील घराघरातही मातीच्याच गणेशमुर्त्यांची स्थापना केली जात असल्याने पर्यावरणाचा संदेश दिला जात आहे.

गावात पूर्वी गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी बैलगाडीचा वापर केला जात होता. आता मात्र स्थानिक धावड कलाकारांनी बनवलेल्या लाकडी रथातून ही मिरवणूक काढली जाते. त्यामुळे स्थानिक कलाकारांना व बलुतेदारांना मान देण्याची परंपरा देखील येथे जोपासली जात असल्याचे पाहायला मिळते. अध्यात्माचा वारसा असल्याने सुरुवातीपासूनच टाळ मृदंगाच्या गजरात श्रींचे आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढली जाते. त्यामुळे आवाजाच्या भिंती आणि गुलाल विरहित मिरवणुकीची परंपरा देखील येथे अबाधित राखली आहे.
गणेशोत्सव काळात पहाटे महापूजा, अखंड हरिनाम सप्ताह आदी कार्यक्रम सलग तेरा दिवस सुरू असतात. या धार्मिक कार्यक्रमाबरोबरच दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम व विविध मैदानी स्पर्धाचेही आयोजन करण्यात येते. या सर्वच उपक्रमात कोणताही भेदभाव केला जात नाही. सर्व जातीधर्माच्या लोकांचा समावेश यात्रा कमिटीतही असल्याने येथील हिंदू मुस्लिम ऐक्यासह सामाजिक सलोखा पूर्वी इतकाच घट्टपणे टिकून आहे.

हेही वाचा - ग्रामीण जीवनाच्या देखाव्यातून सादर केली 'महाराष्ट्राची लोकधारा'; नाचणे येथील सुपल कुटुंबीयांचा उपक्रम

अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी पौर्णिमेला सायंकाळी श्रींची मूर्ती विसर्जनासाठी रथात बसवली जाते. मिरवणुकीत दर्शनासह भारुडी भजनाने संपूर्ण रात्र जागविली जाते. पहाटे गणेश विसर्जन केले जाते. नेमक्या कारणासाठी व योग्य पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणारे आणि गावात एकही गणेश मंडळ नसणारे गाव म्हणून नरवणेची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details