कराड ( सातारा )- कोयना धरणाच्या ( Koyna Dam ) पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी आरक्षित केलेला पाणीसाठा संपत आल्याने वीज कपातीचे संकट उभे राहिले होते. त्यामुळे या प्रकल्पासाठी कृष्णा तंटा पाणीवाटप लवादाने 10 टीएमसी पाणीसाठा वाढवून दिला आहे. परिणामी पश्चिमेकडील वीजप्रकल्पात पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती सुरू राहणार असून अखंडीत वीजपुरवठाही करता येणार आहे. त्यामुळे वीज कपातीचे संकट टळले आहे.
वीजनिर्मितीसाठी असतो 67.50 टीएमसी पाणीसाठा आरक्षित- कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता 105.25 टीएमसी इतकी आहे. धरणातील पाण्याचे वाटप कृष्णा तंटा पाणीवाटप लवादाच्या निर्देशाप्रमाणे होते. 1 जून ते 31 मे हे कोयना धरणासाठीचे तांत्रिक वर्ष गणले जाते. त्यानुसार धरणातील एकूण पाणीसाठ्यापैकी 67.50 टीएमसी पाणीसाठा पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी आणि 30 टीएमसी पाणीसाठा पूर्वेकडील सिंचन, बिगर सिंचनासाठी दिला जातो. पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी आरक्षित केलेल्या पाणीसाठ्यापैकी केवळ 9.13 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. हे पाणी दोन महिने वीजनिर्मिसाठी पुरवावे लागणार होते. सध्या विजेची मागणी वाढली आहे. वीजनिर्मितीचा पाणीसाठा संपत आल्याने पश्चिमेकडील वीजनिर्मिती पाण्याअभावी बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली. ही बाब लक्षात घेऊन 10 टीएमसी पाणीसाठा वीजनिर्मितीसाठी वाढवून देण्यात आला आहे.