सातारा - मुसळधार पाऊस आणि कोयना धरणातून प्रचंड प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने कोयना नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. परिणामी कोयना व कृष्णा नद्यांची पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाल्याने कोयना आणि कृष्णा नदीला महापुराचे स्वरूप निर्माण झाले आहे.
कोयना नदीवरील पाटण शहराशी जोडणारा मुळगाव पूल, संगमनगर धक्का जुना पूल आणि निसरे फरशी पूल पाण्याखाली गेले आहेत. कोयना नदीला महापुराचे स्वरूप आल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने प्रशासनाने कोयना कृष्णा नदीकाठच्या गावांना अलर्ट जारी केला आहे.
तर धरणाचे दरवाजे आणखी उचलावे लागतील..!
सध्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढत असून धरणात सध्या 68 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजे उचलून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास कोयना धरण निर्धारित वेळेत पूर्ण क्षमतेने भरेल. येत्या चोवीस तासांत पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आणखी वाढल्यास धरणाचे दरवाजे आणखी उचलून विसर्ग वाढविण्यात येऊ शकतो. मात्र पावसाचा जोर कमी झाल्यास धरणातील विसर्ग कमीही केला जावू शकतो, अशी माहिती कोयना जलसिंचन विभागाकडून देण्यात आली.
असे पोहचणार पाणी..!
कोयना धरणातून विसर्ग झाल्यानंतर पुराचे पाणी पाटणला 6 ते 8 तासांनी पोहचते. कराडला 16 ते 18 तासांनी तर सांगलीला 28 ते 30 तासांनी पोहचते. त्यामुळे 2 वाजता कोयना धरणातून सोडलेले पाणी पाटणला रात्री 7 ते 9 वाजेपर्यत, कराडला सोमवारी सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत तर सांगलीला मंगळवारी रात्री सकाळी 9 वाजता पोहचू शकते.
पाटण तालुक्यातील जनजीवन विस्कळीत..
कोयना पाणलोट क्षेत्रासहित संपूर्ण पाटण तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पर्जयवृष्टी सुरू असून कोयना धरणातील विसर्गामुळे कोयना नदीला महापुराचे स्वरूप आले आहे.परिणामी नदीकाठच्या पाटण,मंद्रुळ हवेली ,नावडी या गावांतील शेतात पाणी शिरले असून मुळगाव पुलावर पाणी आल्यामुळे नदीपलीकडील गावांचा पाटणशी संपर्क तुटला आहे. परिणामी तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाटणमध्ये सद्या स्मशानभूमीला पाणी लागले आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास पाटण शहरासहित अनेक गावांना धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अतिवृष्टीच्या इशाऱ्याने पुन्हा विसर्ग वाढविला
सध्या कोयना धरणामध्ये 91.10 टीएमसी पाणीसाठा आहे. हवामान खात्याकडून पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा प्राप्त झाला आहे. पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सध्या 41 हजार 191 क्यूसेक असलेल्या विसर्गात वाढ करून संध्याकाळी 4 वाजता एकूण विसर्ग 55 हजार करण्यात येत आहे. तरी कोयना व कृष्णा नदीकाठच्या सर्वांनी कृपया दक्षता घ्यावी, अशी माहिती कोयना सिंचन विभागाने दिली.