महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तांबवे पुलाखाली सापडलेले हॅण्ड ग्रेनेड 1961 सालातील बनावटीचे

कराड तालुक्यातील तांबवे येथील कोयना नदीच्या पात्रात सोमवारी मासेमारी करणार्‍यांच्या गळाला प्लॅस्टीकच्या पिशवीत तीन जिवंत लष्करी हॅण्ड ग्रेनेड सापडले. हे ग्रेनेड 1961 सालातील बनावटीचे असून ते कधी आणि कोणाला वाटप करण्यात आले, यासंदर्भातील रेकॉर्ड तपासले जात आहे. जुने रेकॉर्ड तपासावे लागत असल्याने माहिती मिळण्यास थोडा विलंब होणार असल्याची माहिती आहे.

हॅण्ड ग्रेनेड
हॅण्ड ग्रेनेड

By

Published : May 22, 2021, 3:59 PM IST

कराड (सातारा)- कोयना नदीच्या पुलाखाली मासेमार्‍यांना तीन जिवंत लष्करी हॅण्ड ग्रेनेड सापडले होते. या घटनेचा सखोल तपास तपास यंत्रणा करित आहे. हे ग्रेनेड 1961 सालातील बनावटीचे असून ते कधी आणि कोणाला वाटप करण्यात आले, यासंदर्भातील रेकॉर्ड तपासले जात आहे. जुने रेकॉर्ड तपासावे लागत असल्याने माहिती मिळण्यास थोडा विलंब होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

कराड तालुक्यातील तांबवे येथील कोयना नदीच्या पात्रात सोमवारी मासेमारी करणार्‍यांच्या गळाला प्लॅस्टीकच्या पिशवीत तीन जिवंत लष्करी हॅण्ड ग्रेनेड सापडले. त्यानंतर दहशतवाद विरोधी पथक (एटीएस), बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. हॅण्ड ग्रेनेड लष्करी फॅक्टरीतील बनावटीचे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कराड ग्रामीण पोलिसांनी भारतीय संरक्षण विभागाच्या खडकी (पुणे) येथील आयुध निर्माण फॅक्टरीशी (दारूगोळा कारखाना) पत्रव्यवहार केला. याशिवाय पुणे एटीएस पथकानेही खडकीच्या दारूगोळा फॅक्टरीतील जुने रेकॉर्ड तपासण्याचे काम सुरू केले आहे. हॅण्ड ग्रेनेड निर्मितीच्या बॅच नंबरनुसार ते हॅण्ड ग्रेनेड 1961 साली तयार झाले असल्याची माहिती एटीएस पथकाच्या हाती लागली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या सखोल तपासाला थोडा विलंब होणार आहे.

दारूगोळा फॅक्टरी पुणे

इतके दिवस कुठे होते ग्रेनेड?

कोयना नदीत सापडलेले हॅण्ड ग्रेनेड 1961 सालातील बनावटीचे असतील, तर ते इतके दिवस कुठे होते, याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. कोणताही दारूगोळा तयार करताना त्यावर सिरियल क्रमांक आणि निर्मितीचे वर्ष नमूद असते. त्यावरून स्फोटकाचा प्रकार, निर्मितीची माहिती, वितरीत झालेली तारीख, ते स्फोटक कोणत्या विभागाला आणि कशासाठी वितरित केले, याची नोंद ठेवली जाते. त्यामुळे 1961 सालातील निर्मितीचे ग्रेनेड इतके दिवस कुठे होते, असा प्रश्न निर्माण होतो.

अनेकदा घडल्या घटना -

हॅण्ड ग्रेनेड सापडण्याच्या अनेक घटना मागील तीन वर्षात घडल्या आहेत. उरी येथे नियंत्रण रेषेच्या भागात तैनात असलेल्या जवानाला 23 फेब्रुवारी 2021 रोजी श्रीनगरहून दिल्लीकडे येत असताना श्रीनगर विमानतळावर ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्याकडे हॅण्ड ग्रेनेड सापडले होते. एका अधिकार्‍याने हॅण्ड ग्रेनेड दिल्याचे त्याने प्राथमिक तपासात सांगितले होते. परंतु, नदीत स्फोट घडवून मासेमारीसाठी हॅण्ड ग्रेनेड नेत असल्याचे त्या जवानाने चौकशीत सांगितले असल्याची माहिती लष्कराकडून माध्यमांना देण्यात आली होती. तसेच अलिकडेच नांदेड येथे कचरा कुंडीत आणि पुणे येथे एअरफोर्स स्कूलच्या मैदानावरही जिवंत हॅण्ड ग्रेनेड सापडले होते. त्यामुळे लष्करी स्फोटके सुरक्षा भेदून बाहेर कशी आणली जातात, असा प्रश्नही यानिमित्ताने चर्चेत आला आहे.

प्लॅस्टिकची पिशवी कपड्याच्या दुकानातील -

कोयना नदीपात्रात प्लॅस्टिकच्या पिशवीत हॅण्ड ग्रेनेड सापडली. त्या पिशवीवरील दुकानाच्या नावावरून एटीएस आणि पोलिसांनी मुंबईतील घाटकोपरमध्ये जाऊन त्या कपड्याच्या दुकानाचा शोध घेतला. दुकानदाराकडे प्राथमिक चौकशी करण्यात आली. परंतु, त्याच्याकडून ठोस माहिती मिळू शकली नाही. मुंबईसारख्या शहरातील दुकानांमध्ये रोज असंख्य ग्राहक येऊन जातात. त्यामुळे तपास यंत्रणांना ठोस माहिती मिळू शकली नाही. तर "60 वर्षापुर्वी हॅण्ड ग्रेनेडची निर्मिती झाली असल्याने रेकॉर्ड तपासण्यासाठी थोडा विलंब होणार आहे. रेकॉर्डवरून माहिती हाती आल्यानंतर या प्रकरणाच्या मुळाशी आम्ही नक्की जावू", असा विश्वास पुणे एटीएसचे उपायुक्त सुनील तांबे यांनी व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details