महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातऱ्याच्या पुत्राला पुण्यात वीरमरण; जवान विशाल जाधव अनंतात विलीन

पुण्यातील दापोडी येथे कर्तव्य बजावत असताना अग्निशमन दलातील विशाल जाधव यांना वीरमरण आले होते. त्यांच्यावर आज त्यांच्या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

जवान विशाल जाधव अनंतात विलीन
जवान विशाल जाधव अनंतात विलीन

By

Published : Dec 2, 2019, 8:41 PM IST

Updated : Dec 2, 2019, 11:20 PM IST

सातारा- पुण्यातील दापोडीमध्ये खड्ड्यात पडलेल्या लोकांना वाचवताना झालेल्या दुर्घटनेत अग्निशमन दलातील विशाल जाधव यांना वीरमरण आले होते. आज सोमवारी त्यांच्यावर माण तालुक्यातील त्यांच्या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अग्निशमन दलाच्यावतीने मानवंदना देण्यात आली.

जवान विशाल जाधव अनंतात विलीन

माण-खटावच्या प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार बी. एस. माने, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अग्निशमन विभागाचे अधिकारी किरण गावडे आदी उपस्थित होते. वीरजवान विशाल जाधव यांच्या पत्नी प्रियांका जाधव व कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या आक्रोशाने उपस्थितांची मने हेलावली. या घटनेने माण तालुक्यातील आंधळी गावावर शोककळा पसरली होती. आंधळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने अंत्यसंस्काराला उपस्थित होते.

रविवारी रात्री दापोडी येथे ड्रेनजचे पाईप टाकण्यासाठी खोदलेल्या खड्डयात अडकलेल्या दोन मजुरांना वाचवण्यासाठी गेलेल्या अग्निशमनच्या ३ जवानांसह आणखी दोन मजुरांच्या अंगावर मातीचा ढिगारा कोसळला होता. ते देखील त्याखाली दबले गेले. त्यापैकी चौघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले, तर विशाल जाधव (वय ३२ वर्षे) यांना वीरमरण आले. या घटनेत सरोज पुंडे, निखिल गोगावले या जवानांसह मजूर ईश्वर बडगे, सीताराम सुरवसे यांना सुखरूप काढण्यात आले होते. ड्रेनेजचे पाईप टाकण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात अडकलेल्या दोन मजुरांना बाहेर काढण्यासाठी जवान खड्ड्यात उतरले असता बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. या गर्दीमुळेच मातीचा ढिगारा कोसळल्याने ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा - दुर्दैवी... साताऱ्यात अल्पवयीन मुलाचा नदीत बुडून मृत्यू

माण तालुका प्रशासनातर्फे प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे व तहसीलदार बी. एस. माने यांनी पुष्पहार अर्पण केले. यावेळी अग्निशमन विभागाकडून मानवंदना देण्यात आली आणि ते अनंतात विलीन झाले.

Last Updated : Dec 2, 2019, 11:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details