सातारा -शेतकरी म्हणले की, मनात बैलाचे चित्र उभे राहते. बैल सोडून शेतकरी ही व्याख्याच पुर्ण होणार नाही, इतके घट्ट नात आहे, या दोन्ही राबणाऱ्या जीवांचे. आपल्या लेकरांपेक्षा जास्तवेळा आपल्या बैलांच्या अंगावरून हात फिरवणाऱ्या शेतकऱ्याला आपला बैल गेल्याचे दुःख कायम बोचत राहते. घराला तुऱ्हाट्याचा कुड नसतो, तेव्हा बैलाच्या जिवावर आरसीसी बंगल्याची स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांना अशा कित्येक 'राजा' बैलांनी आरसीसी बंगला बांधायचे बळ दिले आहे. असाच काहीसा प्रवास आहे, सातारा तालुक्यातील शेतकरी विनोद इंदलकर यांचा. बेंदूर सणाला इंदलकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाध साधत आपल्या राजा'च्या आठवणींना उजाळा दिला.
गेली तीन पिढ्यांपासून प्रत्येक बेंदुराच्या सणाला घरी बैल असतो. मात्र, राजा नावाचा बैल वारला तेव्हापासून ही परंपरा मोडली. त्याची कायम खंत वाटते. त्याबाबतची भावना शेतकरी विनोद इंदलकर यांनी ईटीव्हीशी बोलताना व्यक्त केली आहे. 'बेंदूर झाला अन् राजा गेला'
बेंदूर हा शेतकऱ्यांचा सण मानला जातो. मात्र, खऱ्या अर्थाने ती एक बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे. आज आमच्याकडे शेतीव्यतिरिक्त तीन ट्रॅक्टर आहेत, मळणी यंत्र आहे. एक पिठाची गिरणी आहे. ही सर्व सुबत्ता आमच्या 'राजा'मुळे आम्ही बघतो आहोत. गेल्यावर्षी बेंदूर झाला अन् आजारी असलेला आमचा राजा गेला. कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्याला आम्ही सांभाळले. माझ्या शेतीची सुरुवात 1998 पासूनची. त्यावेळी जगण्यासाठी संघर्ष सुरू झाला होता. आयुष्यात पहिली खरेदी राजाची. त्या राजाचा "माझ्या कुटुंबाचे यश, समृद्धीमध्ये मोठा वाटा आहे. तो आल्यापासून घराचा कायापालट झाला. 24 वर्षे त्याने आम्हाला साथ दिली. त्याच्यामुळे शेती फुलली. आज दारात तिन ट्रॅक्टर आहेत. मळणी यंत्र घेतले, पिठाची गिरणी सुरू झाली. हे सगळ राजामुळे. मात्र, माझा संघर्ष सुरू झाल्यापासून यशापर्यंतचा साक्षीदार असणारा राजा 2020 झाली आम्हाला सोडून गेला. हे सांगताना विनोद इंदलकर यांना गहिवरुन आले होते.
'गावात राहिले फक्त 3 बैल'
अवखळ वयात त्याने दिलेल्या एका धडकेने बरगडीत वेदना झाल्या. आजही अधूनमधून होणार्या हलक्याशा वेदना जाणवतात. त्याने अंगावर केलेले वार, त्याच्या प्रेमाच्या आठवणीची जाणीव करत राहतात, हे सांगताना विनोद इंदलकर चांगलेच गहिवरले होते. गावातून बेंदूराला मिरवणूक निघाली की, पहिला बैल बेंदूराच्या ठिकाणी पोहचला तरी शेवटचा बैल जागेवरून हाललेला नसायचा, इतकी मोठी रांग त्यावेळी असायची. मात्र, आज 450 उंबऱ्याच्या गावात तीनही बैल पाहायला मिळायचे नाहीत, अशी दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशी खंत हणमंत इंदलकर यांनी व्यक्त केली आहे. आजची परिस्थिती म्हणजे गावागावातील शेतकरी व्याकुळ झालीत. पत्र्याची घरे आरसीसी झाली, बैलगाडीची जागा कारने घेतली, सोयी-सुविधा आल्याने, शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य झाले. गॅरेजमध्ये ट्रॅक्टर आले, गाडी-घोडे आले, गोठ्यात चार जनावरे वाढली. परंतु, दावणीला बांधायला बैल राहिला नाही, ही अवस्था आज खेड्यापाड्यातील अनेक शेतकरी कुटुंबात आहे.