सातारा - येथील बाँबे रेस्टॉरंटजवळील कणसे होंडा शोरूममध्ये प्री डिलेव्हरी व स्टॉक इंचार्ज असलेल्या एका कर्मचाऱ्याने विक्रीपूर्वी शोरूममधून २३ लाख २५ हजार ६५३ रुपये किंमतीच्या ४४ गाडया चोरून परस्पर विकल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर पसार झालेल्या या कर्मचाऱ्याला शोधून पोलिसांनी २७ मोटारसायकली हस्तगत केल्या. शशीकांत चांगदेव नलवडे (रा.कोडोली सातारा), असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव आहे. 26 डिसेंबरला शोरूम मॅनेजरने त्याच्याविरुद्ध ४४ मोटारसायकल चोरल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दिली होती.
साताऱ्यातील कणसे होंडा शोरूमच्या मॅनेजरने तेथे कार्यरत असलेल्या शशिकांत नामक स्टॉक इंचार्जने शोरूममधून ४४ मोटरसायकल चोरून परस्पर विकल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात केली होती. या प्रकरणी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक एन.एस. कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी संशयिताचा तपास सुरू केला. यामध्ये तो परराज्यात असल्याची माहिती मिळाली होती. परंतु, त्याचा नेमका ठावठिकाणा लागत नव्हता. त्यामुळे त्याला पकडणे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. 28 डिसेंबरला शशीकांत गोव्याहून कोल्हापूरला त्याच्या मित्राकडे येणार असल्याचे गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. मात्र,येथूनही त्याने पोलिसांना गुंगारा दिला. मात्र, पोलिसांनी त्याला गगनबावडा (कोल्हापूर) येथील डोंगरात शिताफीने पकडले. अधिक चौकशीत त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.