सातारा- कोणी कितीही मोठा असता तरी शासकीय कामात अडथळा किंवा शासकीय कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार, असा इशारा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे. सोमवारी (दि. 11मे) म्हसवडच्या नगरसेवकाने पोलीस उपनिरीक्षकास अर्वाच्य भाषेत बोलत दमदाटी केली होती. याबाबत ते बोलत होते.
ते म्हणाले, म्हसवड नगरपालिकेतील नगरसेवक अकिल काझी याची पार्श्वभूमी तपासून त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश साताऱ्याच्या पोलीस अधिक्षकास दिले आहे. पोलिसांवर कोणी हल्ला करेल किंवा कोणत्याही शासकीय कामात अडथळा निर्माण करुन कर्मचाऱ्यांना दमदाटी करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना तत्काळ अटक करण्यात येणार असल्याचे गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले.