सातारा - जिल्ह्यात दुष्काळ जाहीर होवून ७ ते ८ महिने झाले. मात्र, प्रशासनाने चारा छावण्या सुरू करण्यासाठी एप्रिल महिना लावला. यामुळे शेतकरी वर्गात मोठी नाराजी होती. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी माण तालुक्यात २० चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी १८ चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. चारा छावणीमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने पथके तयार केली आहेत.
जिल्हा, तालुकास्तरीय अशी ५ पथके तयार करण्यात आली आहेत. त्यांचा छावण्यावरती पहारा असणार आहे. जिल्ह्यात दुष्काळी स्थिती गंभीर बनली आहे. पशुधनाला पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, शेतकऱ्यांनी आम्हाला पाणी मिळत नाही तर जनावरांना कुठून मिळणार असा प्रश्न उपस्थित करत नागरिकांना पाणी पिण्यासाठी नाही. मग जनावरांना शासन पाणी पुरवठा कसा करते..? असा देखील प्रश्न उपस्थित राहत आहे.
शासनाकडून शेळ्या मेंढ्यांसाठी प्रतिदिन ४ लिटर तर लहान जनावरांसाठी प्रति दिन १५ लिटर व मोठ्या जनावरांसाठी प्रतिदिन ३५ ते ४० लिटर पाणी प्रशासनाकडून टँकरने दिले जात असल्याची माहिती दिली जात आहे. मात्र स्थानिक पातळीवर फक्त कागदोपत्रीच जनावरांचे टँकर दिसून येत असल्याचे समोर आले आहे. पावसाळ्यात दुष्काळी माण, खटाव, कोरेगाव, फलटण तालुक्यात पाऊस झाला नाही. परिणामी चारा उत्पादन घटले गेले. त्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. या भागात चारा छावण्या सुरू करण्याशिवाय कोणताही पर्याय राहिलेला नव्हता. त्यामुळे या भागात छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत.