सातारा: लडाखमधील लेह जिल्ह्यात लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत शहीद झालेल्या जवानांमध्ये सातार्यातील जवानाचा समावेश आहे. वैभव भोईटे, असे शहीद जवानाचे नाव आहे. फलटण तालुक्यातील हिंगणगावचे ते सुपूत्र आहेत. या घटनेमुळे फलटण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. संपूर्ण तालुक्यात शहीद जवानाच्या श्रध्दांजलीचे बॅनर लागले असून हिंगणगाव ग्रामस्थांना आता जवानाच्या पार्थिवाची प्रतिक्षा आहे.
लडाखमध्ये होती पोस्टिंग: लडाखच्या लेह जिल्ह्यात शनिवारी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सैनिकांना घेऊन निघालेले लष्करी वाहन दरीत कोसळले. लष्कराच्या वाहनात 10 सैनिक होते. या अपघातात नऊ जवानांचा मृत्यू झाला तर एक जवान जखमी झाला आहे. दक्षिण लडाखमधील न्योमा येथील कियारीजवळच्या दुर्घटनेत शहीद झालेल्या जवानांमध्ये सातारा जिल्ह्यातील हिंगणगाव (ता. फलटण) गावचा सुपूत्र वैभव भोईटे यांचा समावेश आहे. त्यांच्या युनिटची पोस्टिंग लडाखमध्ये होती.
पोलीस दलावरही शोककळा : शहीद जवान वैभव भोईटे हे लष्कराच्या 311 आर्टिलरी रेजिमेंटमध्ये ते कार्यरत होते. सध्या त्यांची लडाखमध्ये पोस्टिंग होती. पोस्टिंच्या ठिकाणी जात असताना वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात ते शहीद झाले. त्यांची पत्नी सातारा पोलीस दलात कार्यरत आहे. त्यामुळे वैभव यांच्या शहीद होण्याने सातारा जिल्हा पोलीस दलावर देखील शोककळा पसरली आहे. त्यांच्या शहीद होण्याची वार्ता फलटण तालुक्यात वार्यासारखी पसरली. त्यानंतर गावोगावी शहीद जवानाच्या श्रध्दांजलीचे बॅनर लावण्यात आले आहेत.
हिंगणगाव, राजाळेत व्यवहार बंद :आपल्या गावचा सुपूत्र वैभव भोईटे हा शहीद झाल्याचे समजताच हिंगणगावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. तसेच वैभव यांचे कुटुंबीय सध्या राजाळे येथे स्थायिक असल्याने राजाळे ग्रामस्थांनी देखील सर्व व्यवहार बंद ठेऊन त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे. हिंगणगाव ग्रामस्थांना आपल्या लाडक्या सुपूत्राच्या पार्थिवाची प्रतिक्षा आहे. पार्थिव नेमकी कधी गावी पोहचेल, याची माहिती लष्करी सुत्रांकडून मिळालेली नाही.
हेही वाचा -
- JK Encounter : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले 3 जवानांना वीरमरण, कुलगाममध्ये शोधमोहीम सुरु
- Firing In Mumbai Jaipur Express : 'तो मानसिकदृष्ट्या आजारी होता, अधिकारी छळ करायचे';जवानाच्या कुटुंबियांचे धक्कादायक खुलासे
- Two Soldiers Martyred : नक्षल्यांबरोबरील चकमकीत झारखंडमध्ये दोन जवानांना वीरमरण, स्वातंत्र्य दिनीच कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर