सातारा - कोरेगावात रविवारी (दि. 13 मार्च) आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीदरम्यान एक बैलगाडी प्रेक्षकांमध्ये घुसल्याने सहा जण जखमी झाले. जखमींवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.
बिथरलेले बैल गाडीसह घुसले प्रेक्षकांत -कोरेगावात प्रशासनाकडून रितसर परवानगी घेऊन लघू औद्योगिक वसाहतीसमोरील मैदानावर रविवारी बळीराजा प्राणी व बैलगाडी शर्यत बचाव समिती, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. केवळ पश्चिम महाराष्ट्रच नव्हे तर कोकण, नवी मुंबई, पालघर जिल्ह्यातून बैलगाडी शर्यत शौकिनांनी मोठी गर्दी केली होती. स्पर्धेच्या प्रारंभीपासून प्रेक्षकांना ध्वनीक्षेपकावरुन सूचना दिल्या जात होता. मात्र, त्यांचा उत्साह दांडगा असल्याने वारंवार शर्यतीमध्ये व्यत्यय येत होता. फेरा क्रमांक 38 ते 40 च्या दरम्यान प्रेक्षकांनी प्रचंड गोंधळ केल्याने फाटी क्रमांक 1 मधील बैलगाडी प्रेक्षकांमध्ये घुसली, त्यात पाच ते सहा जण जखमी झाले आहेत.