कराड (सातारा) - नागरिकांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून पळ काढणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून जबरी चोरीचे आणखी गुन्हेही उघडकीस आले. या चोरट्यांनी कराड शहर, पाटण शहर आणि ढेबेवाडी (ता. पाटण) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चेन स्नॅचिंग आणि जबरी चोरीचे सहा गुन्हे केले आहेत. अक्षय शिवाजी पाटील (रा. मंद्रुळ कोळे, ता. पाटण) आणि बंटी उर्फ विजय अधिक माने (रा. शितपवाडी, ता. पाटण), अशी सोनसाखळी चोरट्यांची नावे आहेत.
हेही वाचा -जळगावात दुचाकींच्या स्पेअरपार्टची विल्हेवाट लावणाऱ्यांना अटक
कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चेन स्नॅचिंग आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना ढेबेवाडीतील दोघांनी कराड आणि पाटण तालुक्यात चोरीचे गुन्हे केल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. शाखेचे सहाय्यक फौजदार राजेंद्र पुजारी, पोलीस नाईक आनंदा जाधव आणि सचिन साळुंखे यांना ही गुप्त माहिती मिळाल्यानंतर शाखेच्या पथकाने ढेबेवाडीत जाऊन या दोघांना ताब्यात घेतले. कराड शहर, पाटण शहर आणि ढेबेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरीसह जबरी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दोघांनी तपासावेळी दिली. कराड शहर आणि ढेबेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक जबरी चोरीचा गुन्हा आणि पाटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरीचे 4 गुन्हे उघडकीस आले. संशयितांनी चोरलेला सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, कराडचे पोलीस उपाधीक्षक डॉ. रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार ही या कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, सहाय्यक फौजदार राजेंद्र पुजारी, हवालदार सतीश जाधव, नितीन येळवे, जयसिंग राजगे, पोलीस नाईक संजय जाधव, सचिन साळुंखे, कॉ. मारूती लाटणे, प्रफुल्ल गाडे, विनोद माने, तानाजी शिंदे, आनंदा जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हेही वाचा -ओडिशाच्या एका गावात एकाच कुटुंबातील 6 जणांची हत्या