महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोयना धरणाचे दरवाजे साडे तीन फुटांवर; नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तसेच विजापूर भागात सध्या हे वादळ आहे. ते जत-विटा हा पट्टा पार करत कराड भागात पोहचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील चारही धरणांतून विसर्ग वाढवण्यात आला आहे. कोयना धरणाचे सहा दरवाजे साडे तीन फुटांनी उघडण्यात आले आहेत.

Koyna Dam
कोयना धरण

By

Published : Oct 15, 2020, 12:00 PM IST

सातारा -परतीच्या संततधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे कोयना धरणाचे सहा दरवाजे साडे तीन फुटांनी उघडण्यात आले आहेत. सध्या धरणातून 34 हजार 211 क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडले जात आहे. कण्हेर, धोम आणि तारळी या धरणांचे दरवाजे आणि पायथा वीजगृहातूनही पाण्याच्या विसर्ग सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

बुधवारी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे आज सकाळी कोयना धरणातील विसर्ग वाढवण्यात आला. कोयनातून 34 हजार 211 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीत सुरू आहे. धोम धरणातून 3 हजार 515 क्युसेक, कण्हेरमधून 3 हजार 566 क्युसेक, तारळीमधून 3 हजार 641 क्युसेक आणि उरमोडी धरणातून प्रति सेकंद 400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणात प्रतिसेकंद 24 हजार 132 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणातील पाणीसाठा 104.38 टीएमसी झाला आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे साडे तीन फुटांनी उचलण्यात आले आहेत.

गुरूवारी सकाळी 8 वाजेपर्यंत कोयनानगरमध्ये 69 मिमी, नवजा येथे 70 मिमी, आणि महाबळेश्वर येथे 126 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सातारा जिल्ह्यातील पाचही धरणांतून विसर्ग सुरू असल्यामुळे कोयना, कृष्णा, वेण्णा, तारळी आणि उरमोडी या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. येत्या काही तासात विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना घरातून बाहेर पडू नये, झाडाखाली थांबू नये, पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा. विजांचा कडकडाट सुरू असताना मोबाईलवर बोलू नये, अतिवृष्टीत नदी अथवा ओढे, नाल्याच्या पाण्यात जाऊ नये, सेल्फी काढण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन सातारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details