महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शरद पवारांच्या अपमानाचा हिशोब साताऱ्याच्या पोटनिवडणुकीत चुकता करा - श्रीनिवास पाटील

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी अर्ज दाखल केल्यानंतर कराड नगरपालिकेजवळ झालेल्या आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

कराड येथील काँग्रेसची प्रचारसभा

By

Published : Oct 4, 2019, 7:47 PM IST

सातारा - यशवंतराव चव्हाण यांची परंपरा जपणार्‍या शरद पवारांचा सातारा जिल्ह्यात जो अपमान झाला आहे, त्याचा हिशोब सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत चुकता करण्यासाठी हात आणि घड्याळ्याच्या चिन्हाला मतदान करा, असे भावनिक आवाहन सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी केले.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी अर्ज दाखल केल्यानंतर कराड नगरपालिकेजवळ झालेल्या आमदार चव्हाण यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे, काँग्रेसचे सातारा जिल्हा निरीक्षक सुरेश कुराडे, युवक काँग्रेसचे सरचिटणीस शिवराज मोरे, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते, महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस रजनी पवार, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यास विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा - उमेदवारी न मिळणं अनपेक्षीत, आत्मपरिक्षण करणार - विनोद तावडे

श्रीनिवास पाटील म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या पाच वर्षात कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात केलेल्या विकासकामांची मोजदाद करणे अवघड आहे. सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लागली. लोकांनी माझ्याकडे येऊन तुम्हीच उमेदवारी घेण्याचे आवाहन केले. अखेर उमेदवारीची माळ माझ्या गळ्यात पडली. वाईला गेलो असताना दोन-तीन जणांनी लोकसभा निवडणुकीवेळची बोटावरील शाई दाखवली. कवलाने शाई घासून काढण्यास मी त्यांना सांगितले. लोकसभा पोटनिवडणुकीची त्यांना इतकी घाई का झाली? असा सवाल करून ते म्हणाले, कुस्तीच्या मैदानात हिंदकेसरी पैलवानाला जोड मिळाली नाही, तर त्याला वाटखर्ची देतात. तशी जनतेने मला दिल्लीला जाण्यासाठी मतांच्या रुपाने वाटखर्ची द्यावी.

आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 20 वर्षानंतर दोन्ही काँग्रेसची मजबूत आघाडी झाली आहे. हे दोन्ही भाऊ 2014 साली झालेली चूक पुन्हा करणार नाहीत. भाजपने विरोधी पक्षांना संपविणार, अशी दर्पोक्ती केली आहे. सत्ताधार्‍यांच्या दहशतीमुळे अनेक नेतेमंडळी पक्ष सोडून गेली. परंतु, ज्यांनी संस्था चांगल्या चालवल्या आहेत. ते पक्षाबरोबर ठाम राहिले आहेत. त्यामध्ये आमदार बाळासाहेब पाटील हे एक आहेत. केंद्रात मंत्री असताना सीबीआय खाते माझ्या अखत्यारित होते. परंतु, सध्याच्या सरकारप्रमाणे सीबीआयचा मी कधी गैरवापर केला नाही. दिल्लीत मोदी व शहा या जोडगोळीची हुकूमशाही सुरू आहे.

हेही वाचा - विधानसभेच्या मैदानातून खडसेंची माघार, रोहिणी खडसेंना सहकार्य करण्याचे आवाहन

चव्हाण पुढे म्हणाले, राज्यातील विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सातारा लोकसभेची पोटनिवडणूकही जाहीर करायला लावली. यामुळे निवडणूक आयोग सुध्दा स्वतंत्रपणे काम करू शकत नाही, हे सिध्द होते. कूटनितीऐवजी सत्ताधार्‍यांनी लोकांच्या पोटापाण्याच्या विषयावर निवडणुका लढाव्यात. आम्ही अनेक मंत्र्यांच्या भष्ट्राचाराची प्रकरणे मुख्यमंत्र्यांच्या निर्दशनास आणली. परंतु, त्यांनी मंत्र्यांना क्लीन चीट दिली. अशा भष्ट्राचारी सत्ताधार्‍यांना सत्तेपासून रोखा. सातारा लोकसभेची निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार श्रीनिवास पाटीलच जिंकणार असून लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका सातारा जिल्ह्यातील राजकारणात टर्निंग पाईंट ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मदनदादांची अवस्था बेंदरातल्या बैलासारखी..

कराड दक्षिणमधील भाजप उमेदवार डॉ. अतुल भोसले यांचे चुलते मदनराव मोहिते यांनी पृथ्वीराज चव्हाणांवर केलेल्या टीकेचा समाचार घेताना काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजितराव पाटील-चिखलीकर म्हणाले, बेंदूर सणावेळी बैल सजवतात. त्याची मिरवणूक काढतात आणि नंतर त्याला दावणीला बांधतात. तशी मदनराव मोहितेंची अवस्था झाली आहे. चिखलीकरांच्या या शाब्दीक कोटीवर टाळ्यांचा कडकडाट झाला.

ABOUT THE AUTHOR

...view details