सातारा- स्वराज्य स्थापन करण्यापूर्वी जागोजागी वतनदार होते. पण आता भाजप-शिवसेनेची वतनदारी संपुष्टात आणून स्वराज्य स्थापन करायचे असल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले. दहिवडी येथील शिवस्वराज्य यात्रेमध्ये ते बोलत होते. राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रेचे दहिवडी शहरात आगमन झाले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार दिपक चव्हाण, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हाध्यक्ष सुनिल माने, जि.प अध्यक्ष संजिवराजे नाईक-निंबाळ, तेजस शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, खटाव-माणचा आमदार कसा असावा हे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी २०१९ ची निवडणूक आहे. राज्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची अवस्था चांगली असताना पवार साहेबांनी आयुष्यभर डोक्यावरचा लाल दिवा हटू दिला नाही. ते लोक आज पक्ष सोडत आहेत. राजकीय व्याभिचार राज्यात सुरु आहेत. आमच्याकडे शरद पवार नावाचे विद्यापीठ आहे. त्यामुळे कोण पक्ष सोडून गेला याची आम्हाला चिंता नाही. राज्यातील नोकऱ्या धोक्यात आहे. एक कोटी लोकं बेरोजगार झाले. उद्योगधंदे आर्थिक संकटात आले आहेत. पश्चिम महाराष्ट्राला निधी मिळू नये असे कुणाला वाटत असेल तर ते राज्याच्या प्रमुखाला वाटते, असे टिकास्त्र मुख्यमंत्र्यांवर त्यांनी सोडले.