सातारा- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील कोरोना परिस्थीतीचा आढावा घेण्यासाठी रविवारी कराडला आले होते. या वेळी पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेते उपस्थित होते. पण यावेळी बैठकीला काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे गैरहजर होते.
तर दुसरीकडे भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजेंनी ही या बैठकीला पाठ फिरवली. मात्र यामध्ये भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले पुढच्या फळीत उपस्थित असताना पाहायला मिळत होते.
शरद पवारांंच्या उपस्थितीत कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृति सदनात कोरोना परिस्थीतीचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीला सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकारी आणि लोक प्रतिनिधी हजर होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसला सोड चिट्टी देणारे भाजप आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे सभापती रामराजे यांच्या गाडी मध्ये जाऊन बसले होते. त्यानंतर काही वेळांनी रामराजे हे गाडीत येऊन बसले. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठकीला काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या अनुपस्थितिचे करण समजू शकले नाही. तर दुसरीकडे शिवेंद्रसिंहराजे यांनी यापूर्वीही उपमुख्यमंत्री अजित पवार व शरद पवार हे सातारा दौऱ्यावर असताना भेट घेतली होती. त्यामुळे साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.