महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'एटीएमकार्ड' बदलत लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीचा शिरवळ पोलिसांकडून पर्दाफाश - शिरवळ पोलीस ठाणे बातमी

एटीएम सेंटरमध्ये अबालवृध्द, महिलांना मदतीचा बहाणा करत रोख स्वरुपात रक्कम घेऊन परागंदा होत फसवणूक करणाऱ्या व विविध राज्यांमध्ये गुन्हे दाखल असलेल्या उल्हासनगर, ठाणे येथील आंतरराज्य टोळीचा फर्दाफाश शिरवळ पोलीसांनी केला आहे.

Shirwal police exposes inter-state gang of ATM card robbers in satara district
शिरवळ पोलीस ठाणे

By

Published : Mar 13, 2021, 5:26 PM IST

सातारा- एटीएम सेंटरमध्ये अबालवृध्द, महिलांना मदतीचा बहाणा करत रोख स्वरुपात रक्कम घेऊन परागंदा होत फसवणूक करणाऱ्या व विविध राज्यांमध्ये गुन्हे दाखल असलेल्या उल्हासनगर, ठाणे येथील आंतरराज्य टोळीचा फर्दाफाश शिरवळ पोलीसांनी केला आहे. टोळीच्या म्होरक्यासह चार जणांना आनेवाडी टोलनाक्यावर पाठलाग करत अटक करण्यात शिरवळ पोलीसांना यश आले आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी

संशयित ठाण्याचे

संबंधित टोळीकडून महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यातील विविध पोलीस ठाण्यामधील गुन्हे उघडकीस येवून 62 विविध राष्ट्रीयकृत बँका व सहकारी बँकांचे एटीएम कार्ड, चारचाकी मोटारीसह 3 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. प्रदीप साहेबराव पाटील (वय 29 वर्षे), विकी राजू वानखेडे (वय 21 वर्षे), किरण कबरु काकणे (वय 35 वर्षे) व महेश पांडूरंग धनगर (वय 31 वर्षे, रा. म्हारळगाव, उल्हासनगर, ठाणे), अशी संशयितांची नावे आहेत.

हातचलाखीने बदलत होते एटीएम कार्ड

शिरवळ (ता. खंडाळा) येथील एका खासगी कंपनीमध्ये काम करणाऱ्या निलेश शिवाणी सुर्वे हे शिरवळ येथील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममध्ये रक्कम काढण्यासाठी मित्रासमवेत गेले होते. यावेळी त्यांच्या मागे असलेल्या अज्ञात दोघांनी ते करत असलेला व्यवहार पाहिला. एटीएममधून पैसे न निघाल्यामुळे पावती पाहत असतानाच निलेश सुर्वे यांचे कार्ड एटीएम मशीनमधून हातचलाखीने बदलत त्याच बँकेचे त्याच रंगाचे दुसरे एटीएम कार्ड सुर्वे यांच्या हातात दिले. त्यानंतर वेळे व आसले (ता. वाई) येथील पेट्रोलपंपावरुन अचानक 50 हजार 810 रुपये वजा झाल्याचा संदेश आल्याने निलेश सुर्वे यांनी तत्काळ शिरवळ पोलिसांत फसवणूक व चोरीचा गुन्हा दाखल केला.

असा लागला छडा

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत व यापूर्वी घडलेल्या अशाच प्रकारच्या जुन्या सीसीटीव्हीवरुन गुन्ह्याचे अवलोकन करत शिरवळ येथील पोलीस पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे व सीसीटीव्हीचे पाहणी करत चोरीच्या पद्धतीचा अभ्यास केला. हा गुन्हा उल्हासनगर, ठाणे येथील सराईत गुन्हेगारांनी केल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार संबंधितांची माहिती घेतली असता हे संशयित गोवा राज्यात गेल्याचे तपासात समोर आले. पोलीस पथकाने संबंधितांची गोवा राज्यापासून हालचालीचा मागोवा घेतला. संशयित गोव्यातून पुन्हा उल्हासनगरला जाणार असल्याची माहिती मिळाली. शिरवळ पोलिसांनी त्यांचा माग काढत शेंद्रेफाट्यापासून (ता. सातारा) गुन्हेगारांना कोणताही मागमूस न लागू देता वाढेफाटा व आनेवाडी टोलनाका येथे सापळा रचला. त्यांचा थरारक पाठलाग करत पोलिसांनी आनेवाडी टोलनाका कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आनेवाडी टोलनाक्यावर शिताफीने कार (क्र. एम एच 43 टी 0389) मधील संशयितांच्या मुस्क्या आवळल्या.

62 एटीएम कार्ड हस्तगत

त्यांच्याकडील अधिक तपासात शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन गुन्ह्यांसह पडघा (ठाणे ग्रामीण), अहमदनगर येथील राहुरी, सांगोला (जि.सोलापूर), पिंपरी चिंचवड येथील भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण 8 गुन्हे उघडकीस आले. या गुन्हेगारांनी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यातील विविध पोलीस ठाण्यांत विविध गुन्हे केल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले आहे. संबंधीतांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. संशयितांकडून 62 विविध राष्ट्रीयकृत बँका व सहकारी बँकांचे एटीएम कार्ड, मोटार आदी, असा 3 लाख 8 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आणखी मुद्देमाल हस्तगत करण्याचे काम सुरू आहे.

या टोळीवर 24 गुन्हे दाखल

शिरवळ पोलीसांनी सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्यानंतर तपासणीअंती संबंधीतांकडून तब्बल 62 विविध एटीएम कार्ड सापडली. पोलीसांनी सलग दोन दिवस व रात्र विविध बँकेतील एटीएम कार्ड धारकांची माहीती व मोबाईल नंबर मिळवून त्याच्याशी संपर्क साधला असता संबंधीतांची मोठ्या प्रमाणात फसवणूक व चोरी झाल्याचे निर्दशनास आले. या संशयितांवर महाराष्ट्रातील विविध ठिकाणी 24 गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा -एमपीएससी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी विशेष प्रवासाची परवानगी द्या; युवक काँग्रेसची मागणी

हेही वाचा -तोतया रॉ अधिकाऱ्याला सातारा तालुका पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ABOUT THE AUTHOR

...view details