सातारा- 'गेल्या निवडणुकीत माझी चूक झाली, ती यावेळी तुम्ही दुरुस्त करा' असे उभ्या पावसात भिजत शरद पवारांनी व्यक्त केलेली अपेक्षा केवळ सातारकरांनीच नाही तर समस्त महाराष्ट्रातील जनतेने तंतोतंत सत्यात उतरवली. खासदारकीच्या पोटनिवडणुकीत साताऱ्यात उदयनराजेंना पराभवाला सामोरे जावे लागले. तर राज्यात १०५ आमदारांच्या भाजपवर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली. समस्त देशाने यानिमित्ताने शरद पवार व श्रीनिवास पाटील यांच्यातील ६० वर्षांची 'दिल, दोस्ती अन् दुनियादारी' ही पाहिली!
'दिल-दोस्ती, दुनियादारी' उभ्या महाराष्ट्राने पाहिली; शरद पवारांच्या पावसातील सभेची वर्षपूर्ती सत्तेच्या सरिपाटामागे लागून एकेपाठोपाठ एक करत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणाऱ्या उमेदवारांचे मनसुबेही या सभेने उधळून लावले. राज्यातील सत्तेची समीकरणे साताऱ्यातील 'त्या' ऐतिहासिक सभेने बदलली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या त्या उभ्या पावसातील सभेला आज बरोब्बर एक वर्ष पूर्ण झाले. साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या मैदानावर जमलेल्या अलोट जनसमुदायाने वरुणराजाच्या सक्षीने माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील व शरद पवार यांची 'दिल, दोस्ती अन् दुनियादारी' ही पाहिली.
हेही वाचा -मराठवाड्यात अतिवृष्टी : देवेंद्र फडणवीस सोमवारपासून तीन दिवसांच्या दौऱ्यावर
सत्ताबदलाचा क्लायमॅक्स रंगला तो साताऱ्यातील या सभेने. धुँवाधार पावसात उभ्या महाराष्ट्राला शरद पवार साद घालत होते. कोणीतरी त्यांच्या डोक्यावर छत्री धरली, तेव्हा ती नाकारत, पाऊसधारा अंगावर झेलत ते बोलत राहिले. त्यांच्यामागे त्यांच्यापेक्षा वयाने थोडा वडिलबंधू उमेदवार पावसात उभा राहिला. प्रचंड गर्दी या भाषणादरम्यान इंचभरही हलली नाही हे दृश्य तमाम गर्दी, उभा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी लाईव्ह पाहत होता.
अवघ्या काही मिनिटांच्या भाषणाणे अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला आणि समोर पैलवानचं शिल्लक नाही म्हणणाऱ्या भाजप विरोधात ८० वर्षांच्या शरद पवारांनी साताऱ्याच्या क्रांतीच्या मातीत शड्डू ठोकत नकळत पण तितक्याच राजकीय मुत्सद्दीपणे सत्तांतराची बिजे रोवली. हजारोंच्या साक्षीने कोसळणाऱ्या पावसाने त्या बिजांना पाणी घातले. सातारकरांनी पवारांच्या विनंतीला मान देत लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजेंऐवजी खासदार म्हणून राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांना पसंती दिली, हे साऱ्या देशाने पाहिले.
हेही वाचा -दसऱ्यापासून जिम, व्यायामशाळा सुरू करण्यास मान्यता; मुख्यमंत्र्यांची माहिती
त्या सभेतील अनुभवाबाबत खासदार श्रीनिवास पाटील यांनी आपल्या भावना 'ईटीव्ही भारत'शी बोलताना शब्दातून उभ्या केल्या. ते म्हणाले, त्या पावसात मी आणि पवारसाहेब चिंब भिजलो ते केवळ पावसातच नव्हे तर सातारकरांच्या आणि कार्यकर्त्यांच्या प्रेमात. युवक काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून आमच्यात परस्पर स्नेह होता. त्याची जोपासणा आम्ही केली. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीला वंदन करून ठामपणे ही निवडणूक लढवली आणि जनतेने आमच्या पदरामध्ये यशाचे सूप भरभरून ओतले.