सातारा -रयतचं स्वत:चं विद्यापीठ असावं, हे आपणा सर्वांचं स्वप्न होतं. त्याचा पाठपुरावा सुरु होता. त्याला केंद्र व राज्य शासनाची परवानगी मिळाली आहे. आवश्यक त्या बाबींची पुर्तता झाल्यानंतर येत्या जून पासून पद्मभूषण डाॅ. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सुरु करु शकू, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी कर्मवीर पुण्यतिथीच्या समारंभात व्यक्त केला.
पद्मभूषण डाॅ. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ जून पासून सुरु - शरद पवार
दोन वर्षांनंतर हा समारंभ होत आहे. या समारंभाला न चुकता हजेरी लावणारे डाॅ. एन. डी. पाटील, आमदार गणपतराव देशमुख, शंकरराव कोल्हे आज नाहीत. त्यामुळे मी अस्वस्थ आहे. आज संस्थेचा मोठा कार्यविस्तर झाला आहे. कर्मवीर अण्णांनी ग्रामीण भागात शिक्षणाचं जे रोपटं लावलं त्याचं वटवृक्षात रुपांतर झालयं. आधुनिक तंत्रज्ञान मुलांपर्यंत पोहचतोय. त्यात मोठा वाटा 'रयत'चा आहे, याचा मला अभिमान आहे, असे शरद पवार म्हणाले.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त सातारा येथे त्यांच्या समाधीस्थळास शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, संस्थेचे चेअरमन डाॅ अनिल पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, मंत्री विश्वजीत कदम, खासदार सुप्रिया सुळे, रामशेठ ठाकूर , आमदार प्रशांत ठाकूर, शशिकांत शिंदे आदी मान्यवरांनी कर्मवीर अण्णांच्या समाधीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर संस्थेच्या प्रांगणात झालेल्या समारंभात शरद पवार बोलत होते.
रयतचा अभिमान -ते पुढे म्हणाले, "दोन वर्षांनंतर हा समारंभ होत आहे. या समारंभाला न चुकता हजेरी लावणारे डाॅ. एन. डी. पाटील, आमदार गणपतराव देशमुख, शंकरराव कोल्हे आज नाहीत. त्यामुळे मी अस्वस्थ आहे. आज संस्थेचा मोठा कार्यविस्तर झाला आहे. कर्मवीर अण्णांनी ग्रामीण भागात शिक्षणाचं जे रोपटं लावलं त्याचं वटवृक्षात रुपांतर झालयं. आधुनिक तंत्रज्ञान मुलांपर्यंत पोहचतोय. त्यात मोठा वाटा 'रयत'चा आहे, याचा मला अभिमान आहे."
गणपतराव देशमुख यांना मरणोत्तर कर्मवीर पुरस्कार -कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त देण्यात येणारा पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार दिवंगत भाई गणपतराव देशमुख यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला. अडीच लाख रुपये सन्मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार त्यांच्या पत्नी रतनबाई देशमुख यांनी शरद पवार यांच्या हस्ते स्वीकारला. रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार कोंभाळणे जिल्हा नगर येथील बीज माता राहीबाई पोपेरे (अडीच लाख रुपये सन्मानचिन्ह व मानपत्र) व ईस्माइलसाहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार दिलीप वळसे पाटील (२५ हजार रुपये सन्मानचिन्ह व मानपत्र) यांना प्रदान करण्यात आला.
देणगिदारांचा सढळ हात -कार्यक्रमात रयत शिक्षण संस्थेला 25 लाखांपेक्षा जास्त देणगी देणारे देणगीदार, संस्थेचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील निवड झालेले अधिकारी विद्यार्थी, राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांची विद्यापीठ गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळविणारे विद्यार्थी व कर्मवीर पारितोषिक मिळविले मान्यवर यांचा सन्मान खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला. मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुरस्काराच्या रक्कमेत स्वत:ची भर घालून २५ लाख रुपयांची देणगी संस्थेला दिली. कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेचे आजी-माजी सेवक, पदाधिकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.