सातारा -साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र शासनाने पॅकेज द्यावे, अशी मागणी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. त्यानुसार केंद्र शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन साखर उद्योगाला सावरण्यासाठी पॅकेज द्यावे, अशी मागणी करत गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाईंनी शरद पवारांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.
'केंद्राने साखर उद्योगाला पॅकेज देणं गरजेचे'; शरद पवारांच्या मागणीला शंभूराज देसाईंचा पाठिंबा - साखर उद्योगाला पॅकेज
साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले होते. यामध्ये त्यांनी केंद्र शासनाने पॅकेज द्यावे, अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणी गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाईंनी पाठिंबा दिला आहे.
अडचणीत सापडलेल्या सहकारी साखर कारखानदारीला वाचवण्यासाठी देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे साखर उद्योगाला पॅकेज देण्याची मागणी केली आहे. त्याचे समर्थन करताना देसाई म्हणाले की, मागील 3 वर्षांपासून महाराष्ट्रातील संपूर्ण साखर कारखानदारी प्रचंड आर्थिक अडचणीत आहे. जागतिक आणि देशातंर्गत बाजारापेठेत साखरेचे भाव कोसळले आहेत. त्यामुळे सर्वच सहकारी साखर कारखाने प्रचंड आर्थिक अडचणीत आले आहेत. ऊस उत्पादकांना द्यायचा एफआरपी केंद्र सरकारने निश्चित केला. त्यावेळी बाजारात साखर विक्रीचा दर आणि शेतकर्यांना एफआरपी देत असताना कारखान्यांतील साखरेला बाजारात मिळालेल्या दरातील फरक पाहिला तर किमान एका साखरेच्या पोत्याला 700 ते 800 रुपये इतकी घट येत असल्याचे देसाई म्हणाले.
शरद पवार यांनी केलेली मागणी योग्य आणि गरजेची आहे. त्यामुळे केंद्र सरकारने त्यावर धोरणात्मक निर्णय घेऊन सहकारी साखर उद्योगाला भरीव पॅकेज द्यावे, अशी मागणी आपण सर्व कारखानदारांच्यावतीने करत असल्याचे देसाई म्हणाले.