पाटण (सातारा) - सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण अर्बन बँक, पाटण तालुका खरेदी विक्री संघ, श्रीराम नागरी संस्था, पाटण एज्युकेशन अॅन्ड डेव्हल्पमेंट ट्रस्ट यांच्या माध्यमातून पाटण विधानसभा मतदारसंघातील डॉक्टर्स, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स, पोलीस कर्मचारी, आरोग्य सेविका, सफाई कर्मचारी, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, सर्कल यांंच्यासाठी दोन हजार बॉटल्स सॅनिटायझर मदत म्हणून देण्यात आले. यावेळी पाटणकर यांनी कोरोनाशी लढणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक केले.
पाटण तालुक्यामध्ये मुंबई-पुणे व इतर मोठ्या शहरांमधून आलेल्या लोकांची संख्या जास्त असतानाही आपण सर्वांनी 'लॉकडाऊन'मध्ये केलेल्या चांगल्या नियोजनामुळेच कोरोनाचा प्रसार रोखण्यात व नियंत्रित ठेवण्यात आपल्याला यश आले आहे, असे सत्यजितसिंह पाटणकार म्हणाले. कोरोनावर सर्वजण एकत्र येऊन नक्कीच मात करू, असा विश्वासही व्यक्त केला.
सध्या संपूर्ण जगभर कोरोनाशी एक प्रकारे लढाईच चालू आहे. या चालू असलेल्या लढाईमध्ये डॉक्टर, पोलीस कर्मचारी, ग्रामसेवक, आशा व अंगणवाडी सेविका, सफाई कामगार, विविध विभागांचे सरकारी अधिकारी व कर्मचारी आपली जबाबदारी एखाद्या योद्ध्याप्रमाणे चोख बजावत आहेत. पाटण तालुक्यातील कोरोना विषाणूचा प्रसार सध्या तरी आटोक्यात आहे. एक-दोन अपवाद वगळता कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले नाहीत. याचे श्रेय पाटण विधानसभा मतदारसंघातील प्रशासकीय व पोलीस यंत्रणेला द्यावेच लागेल. कोरोनावर मात करावयाची असल्यास सर्वांचे आरोग्य चांगले राहणे व त्यांना कोरोनाची लागण न होणे अतिशय महत्त्वाचे आहे. या लढाईमध्ये ही सर्व मंडळी एखाद्या देवदूताप्रमाणे सर्व सामान्य जनतेची ढाल बनून रात्रंदिवस काम करत आहेत. त्यासाठी एक छोटीशी मदत म्हणून दोन हजार बाटल्या सॅनिटायझर उपलब्ध करून देत आहे, असे सत्यजितसिंह पाटणकर यांनी म्हटले. या मदतीसाठी पाटणकर यांचे सर्व अधिकाऱ्यांनी आभार मानले.
पंचायत समिती सभापती राजाभाऊ शेलार, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार समीर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, पाटण नगरपंचायतचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी, सर्व संस्थांचे चेअरमन, पाटण नगरपंचायत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, उपस्थित होते.