सातारा(कराड) - पाटण तालुक्यात फक्त विकासाच्या घोषणा झाल्या. 1800 कोटींचा विकास झाल्याचे ढोल बडविण्यात आले. मग तो दिसत का नाही. तालुक्याचा विकास अतिवृष्टीत वाहून गेला की काय, असा उपरोधिक सवाल सवाल पाटण विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर यांनी आमदार शंभूराज देसाई यांना केला.
ते दिवशी बुद्रूक गावातील प्रचार सभेत बोलत होते. सुजित पाटील, सरपंच संजय थोरात, रामचंद्र असवले, वसंतराव पाटील, माजी सरपंच आबासाहेब पाटील उपस्थित होते.
युती सरकारकडून शेतकरी, युवकांवर अन्याय झाला. यंदा तालुक्यात अतिवृष्टी आणि महापूर आला. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करणे गरजेचे होते, असे सांगून सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, कर्जमाफीची पोकळ घोषणा करून सरकारने शेतकर्यांना झुलवत ठेवले आहे. अटी घातल्याने कर्जमाफी फसवी ठरली आहे. राष्ट्रवादीची सत्ता आल्यास सर्वप्रथम शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी दिली जाणार आहे. यापूर्वी विक्रमसिंह पाटणकर आणि श्रीनिवास पाटील या जोडीने तालुक्याचा विकास केला आहे. आता तोच योग आला आहे. ही संधी जनतेने दवडू नये, असेही ते म्हणाले.
सत्यजितसिंह पाटणकर, विक्रमसिंह पाटणकर हे विकासाची दृष्टी असणारे नेते आहेत. ते जे बोलतात ते करून दाखवितात. म्हणूनच तालुक्याने सत्यजितसिंहांना आमदार करण्याचा ध्यास घेतला आहे, असे सुजित पाटील म्हणाले.