महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साताऱ्यातील कुख्यात गुंड पिल्या नलवडेवर 'एमपीडीए'अंतर्गत कारवाई - सातारा पोलीस बातमी

बोगद्यातील कुख्यात गुंड पिल्या उर्फ विजय राजू नलवडेवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील ही गेल्या दोन वर्षांतील चौथी कारवाई आहे.

d
d

By

Published : Aug 21, 2021, 5:16 PM IST

Updated : Aug 21, 2021, 5:29 PM IST

सातारा - बोगद्यातील कुख्यात गुंड पिल्या उर्फ विजय राजू नलवडेवर महाराष्ट्र झोपडपट्टीदादा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील ही गेल्या दोन वर्षांतील ही चौथी कारवाई आहे. या दोन वर्षांत 10 टोळ्यांतील 58 जणांवर मकोका तर 10 टोळ्यांतील 41 जणांना तडीपार करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

माहिती देताना पोलीस अधीक्षक

जिल्हा कारागृहात स्थानबद्ध

खंडणी, जबरी चोरी, दरोडा, सरकारी कामात अडथळा, बेकायदा जमाव जमवून गर्दी-मारामारी, तडीपारी आदेशाचा भंग करणे, दुखापत यासह अनेक गंभीर गुन्हे गुंड पिल्या उर्फ विजय राजू नलवडेवर दाखल आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ही कारवाई होताच नलवडेला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्याची रवानगी सातारा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

संधी देऊनही सुधारला नाही

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, राजवाडा, समर्थ मंदिर, बोगदा, मंगळवारपेठ, पावर हाऊस झोपडपट्टी इत्यादी भागात पिल्या नलवडेची दहशत होती. त्याच्याविरोधात शाहूपुरी व सातारा शहर पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. शाहूपुरी पोलिसांच्या तडीपारी प्रस्तावावरून उपविभागीय दंडाधिकारी (प्रांत) यांनी पिल्या नलवडे यास मार्च-2021 पासून सातारा जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले होते. मे-2021 मध्ये तडीपारीचा भंग केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी त्यास अटकही केली होती. त्याच काळात पिल्या नलवडे याने राजवाडा परिसरात दहशत करत एका फळ विक्रेत्याला जबर मारहाण केली होती. पोलिसांनी पिल्या नलवडेवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई व तडीपार करुनही त्याच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने व त्याच्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण होत असल्याने शाहूपुरी पोलिसांनी त्यावर महाराष्ट्र झोपडपट्टीदादा कायद्याखाली कारवाईचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला होता. तो मंजूर झाला आहे.

सातारा पोलिसांचा कारवाईचा धडाका

शाहूपुरी पोलिसांची एमपीडीएची ही सलग दुसरी कारवाई आहे. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत शाहूपुरी दोन आणि कराड व पुसेगाव प्रत्येकी एक, असे एकूण चौघांविरोधात एमपीडीए कायद्याखाली कारवाया करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल य‍ांनी साताऱ्य‍ाची धुरा स्वीकारल्यापासून जिल्ह्यात तीन एमपीडीए, 10 टोळ्यांतील 58 जणांना मकोका तर 10 टोळ्यांतील 41 जणांना तडीपार करण्यात आले आहे. आणखी काही कारवायांची प्रक्रीया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा -सातारा : कास पठार पर्यटकांनी बहरणार; रानफुलांच्या रंगोत्सवाला लवकरच सुरुवात

Last Updated : Aug 21, 2021, 5:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details