सातारा Satara Double Murder : पिकांना पाणी देण्यासाठी रात्री शेतात गेलेल्या दाम्पत्याची अज्ञातानं धारदार शस्त्रानं हत्या केल्याची खळबळजनक घटना साताऱ्यातील माण तालुक्यात घडलीय. संजय रामचंद्र पवार (वय ४९) आणि मनिषा संजय पवार (वय ४५) असं खून झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे.
रात्री दाम्पत्य गेले होते शेतात : माण तालुक्यातील आंधळी गावातील संजय व मनिषा हे दाम्पत्य आपल्या 'पवार दरा' नावाच्या शिवारातील पिकाला पाणी देण्यासाठी शनिवारी रात्री गेले होते. यावेळी रात्री साधारणतः दहा ते अकराच्या दरम्यान अज्ञातांनी धारदार शस्त्रानं त्यांच्या डोक्यावर, मानेवर, गळ्यावर वार करून या दाम्पत्याची निर्घृण हत्या केली आहे.
रविवारी सकाळी घटना आली उघडकीस :रविवारी सकाळच्या सुमारास परिसरातील शेतकरी शेतात जात असताना संजय व मनिषा पवार दाम्पत्याचे रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आढळून आले. त्यामुळं हत्येची घटना उघडकीस आली. नागरिकांनी मृतदेह बघताच आंधळी गावच्या पोलीस पाटलांना या घटनेची माहिती दिली. पोलीस पाटलानं यासंदर्भात पोलीस ठाण्यात कळविल्यानंतर दहिवडी पोलीस ठाण्याचे
सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस पथकासोबत घटनास्थळी दाखल झाले.