कराड (सातारा) : पाटण तालुक्यातील कोरोना रूग्णाचा मृतदेह परस्पर नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पन्हाळा येथील संजीवनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली. येथे उपचार घेताना रूग्णाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी हॉस्पिटलवर कारवाई करण्याचे निर्देश कोल्हापूरच्या प्रशासनाला दिले आहेत.
कोरोना रुग्णाचा मृतदेह परस्पर नातेवाईकांच्या ताब्यात, हॉस्पिटलवर कारवाईचे निर्देश
पाटण तालुक्यातील कोरोना रूग्णाचा मृतदेह परस्पर नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पन्हाळा येथील संजीवनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली. येथे उपचार घेताना रूग्णाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी हॉस्पिटलवर कारवाई करण्याचे निर्देश कोल्हापूरच्या प्रशासनाला दिले आहेत.
पन्हाळा तालुक्यातील नेबापूर येथील संजीवनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कुठरे (ता. पाटण) येथील कोरोना रूग्णावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान रूग्णाचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला. हॉस्पिटलने रूग्णाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह कराडच्या कोरोना स्मशानभूमीत आणला. मात्र, कराड नगरपालिका प्रशासनाने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी घटनास्थळी दाखल होत झालेल्या प्रकाराची माहिती घेऊन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना कळविले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून मृतदेहावर कराडच्या कोविड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले.
दरम्यान, कोरोनाबाधित रूग्णाचा मृतदेह परस्पर नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याप्रकरणी संजीवनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. या धक्कादायक प्रकारामुळे पन्हाळ्यातील कोविड हॉस्पिटल व्यवस्थापनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला.