सातारा- जिल्ह्याचा नॉन रेड झोनमध्ये समावेश झाल्याने, जिल्ह्यात सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र वगळून काही अंशी सूट देण्यात आली आहे. यात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केशकर्तनालय व ब्युटी पार्लर दुकाने उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. एका वेळी दुकानात एकच ग्राहक यासारख्या अटींवर ही परवानगी देण्यात आली आहे.
वाचा काय आहे अटी...
- सेवा घेणारी व्यक्ती ही मास्क लावू शकत नाही, त्यामुळे केशकर्तन कारागीर, ब्युटी पार्लर चालवणारी व्यक्ती यांनी चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक आहे.
- सलून, पार्लरमध्ये एका ग्राहकाला सेवा दिल्यानंतर त्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचे निर्जंतुकीकरण करावे.
- एका ग्राहकाला वापरलेला टॉवेल किंवा अंगावर टाकलेले कापड दुसऱ्या ग्राहकाला वापरू नये. त्यासाठी ग्राहकांच्या संख्ये इतके टॉवेल व कापडाची उपलब्धता दुकानदाराने करुन ठेवावी.
- काही सलून/ पार्लरमध्ये येणाऱ्या लोकांनी फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे.
- केशकर्तनालय व ब्युटी पार्लरमध्ये येणाऱ्या व्यक्तींसाठी रजिस्टर ठेवावे. त्यात क्रमाक्रमाने येणाऱ्या ग्राहकांची नोंद करावी.
- दुकानदाराने त्यांना संभाव्य वेळेची सूचना देवून त्याचवेळी पुन्हा येण्याची विनंती करावी.
- केशकर्तनालय व ब्युटी पार्लरमध्ये या नोंदीच्या क्रमाने ग्राहकांना सेवा द्यावी.
- पहिल्या ग्राहकाचे काम संपल्यानंतर दुसरा ग्राहक सेवेसाठी दुकानात घ्यावा.
- केशकर्तनालय, ब्युटी पार्लरमध्ये कारागीर व ग्राहक अशा दोन व्यक्तीच दुकानात असतील. उर्वरित लोक दुकानाबाहेर थांबतील. मोठ्या सलून किंवा पार्लरमध्ये दोन खुर्चीमध्ये कमीत कमी सहा फुटाचे अंतर ठेवून अतिरिक्त कारागीराला काम करता येईल.