महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिगरबाज वीज कर्मचार्‍यांच्या धाडसाला सातारा जिल्हाधिकार्‍यांचा सलाम - Flood Satara power workers courage

धोकादायक स्थितीत जिवाची बाजी लावून वीज पुरवठा सुरळीत करणार्‍या जिगरबाज वीज कर्मचार्‍यांच्या मेहनत आणि धाडसाला सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सलाम केला आहे.

satara collector salutes power employees
वीज कर्मचारी कौतुक सातारा जिल्हाधिकारी

By

Published : Aug 2, 2021, 6:15 PM IST

सातारा - पाटण तालुक्यात 22, 23 आणि 24 असे सलग तीन दिवस झालेल्या अतिवृष्टीने महापूर आला. महापुरामुळे झाडांच्या फांद्यांमध्ये अडकलेल्या विद्युत तारा झुला बांधून मोकळ्या करत वीज कर्मचार्‍यांनी मरळी (ता. पाटण) परिसरातील अंधारात गेलेली शेकडो घरे उजेडात आणली. धोकादायक स्थितीत जिवाची बाजी लावून वीज पुरवठा सुरळीत करणार्‍या जिगरबाज वीज कर्मचार्‍यांच्या मेहनत आणि धाडसाला सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सलाम केला आहे.

अडकलेल्या विद्युत तारा मोकळे करताना वीज कर्मचारी

हेही वाचा -शिवसेना भवनाकडे तिरके बघण्याचे धाडस होणार नाही - गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

33 केव्ही लाईनच्या तारा होत्या पुराच्या पाण्यात...

पाटण तालुक्यातील मरळी विद्युत उपकेंद्राकडे जाणार्‍या लाईनच्या तारा कोयना नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात गेल्याने वीजपुरवठा खंडीत करावा लागला. पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या लाकडाच्या फांद्यांमुळे विद्युत तारा अडकल्या होत्या. तारांना पीळ पडला होता. परिणामी वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. पाण्याची पातळी कमी होताच वीज कर्मचार्‍यांनी झुला बांधला. एका कर्मचार्‍याने विद्युत तारेला लोंबकळत जाऊन तारांमध्ये अडकलेल्या झाडांच्या फांद्या काढून तारांचा गुंता सोडवला. त्यानंतर मरळी उपकेंद्रांच्या परिसरातील वीजपुरवठा पुर्ववत झाला आणि अंधारातील शेकडो घरे प्रकाशमान झाली. या धाडसी कामगिरीबद्दल साताराचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिगरबाज वीज कर्मचार्‍यांच्या धाडसाचे कौतुक केले.

विद्युत पोल खांद्यावरून नेले...

सातारा जिल्ह्यात पुरामुळे विद्युत पोल कोसळले. विद्युत ताराही तुटल्या. त्यामुळे, वीज पुरवठा खंडीत करावा लागला. अनेक गावे अंधारात बुडाली. अशा परिस्थितीत विद्युत कर्मचार्‍यांनी दुर्गम भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी जिवाची बाजी लावून खांद्यावरून पोल नेले. तुटलेल्या तारा जोडून वीजपुरवठा सुरळीत केला. अतिवृष्टीचा भाग असणार्‍या महाबळेश्वर, कोयनानगर भागात हे चित्र प्रामुख्याने पाहायला मिळाले. नुकसानीच्या पंचनाम्यासाठी महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांनी देखील लाँचमधून जाऊन कोयना, कांदाटी खोर्‍यातील गावोगाव जाऊन पंचनाम्याची कार्यवाही केली.

पंचनाम्याची यादी स्थानिक आमदारांना दाखवा...

शेतीचे पंचनामे करत असताना शेतकर्‍यांच्या खासगी विहिरींच्या झालेल्या नुकसानीचेही पंचनामे करावेत, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या आहेत. शेती आणि रस्ते नुकसानीच्या पंचनाम्याची अंतिम यादी तयार करत असताना ती यादी स्थानिक आमदारांना दाखवावी, असे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सूचित केले आहे. तर, भूस्खलनाचा धोका असणार्‍या गावांनी पुढे येऊन स्थलांतराची भूमिका मांडण्याचे आवाहन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले आहे.

हेही वाचा -पाण्यामुळे दैना, अन् पाण्यामुळेच पोहोचली मदत! पुरात अडकलेल्या ग्रामस्थांपर्यंत बोटीतून पोहोचली मदत

ABOUT THE AUTHOR

...view details