सातारा :जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याचे दिसत आहे. कोरोना झालेल्या दोन रुग्णांचा मृत्यू साताऱ्यामध्ये झाला आहे. त्यानंतर सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये मास्क सक्ती केली होती. परंतु, तक्रारीमुळे हा निर्णय त्यांच्या अंगलट आला. मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांची कानउघाडणी करताच जिल्हाधिकाऱ्यांनी मास्क सक्ती मागे घेतली. तसेच खबरदारी म्हणून मास्क वापरण्याचे आवाहन केले होते. सक्ती केली नव्हती, अशी पलटीदेखील मारली आहे.
मास्क सक्तीची तक्रार : सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये मास्क सक्ती केली होती. मास्क सक्तीमुळे सरकारी कार्यालयांमध्ये प्रवेश मिळण्यास अडचण होत असल्याची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली. त्याची मुख्यमंत्र्यांनी दखल घेत मुख्य सचिवांना विचारणा केली.
मुख्य सचिवांकरवी कानउघाडणी : सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी मास्कसक्ती करण्याचा निर्णय लागू केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मूळचे साताऱ्याचे असल्याने त्यांनी तक्रारीची दखल घेतली. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या कारवाईमुळे सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांची कानउघाडणी करण्यात आली. आठवड्यापूर्वी सातारा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये मास्क सक्ती केली होती. मात्र, तक्रारीनंतर त्यांना आदेश मागे घ्यावा लागला आहे. मास्क सक्तीचे कोणतेही आदेश दिले नव्हते. खबरदारीची उपाययोजना म्हणून सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावा, असे आवाहन केल्याचे स्पष्टीकरण जिल्हाधिकाऱ्यांनी आता दिले आहे.