कराड - सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मराठवाडी येथे वांग नदीच्या बंधार्यात पोहण्यास गेलेल्या दहा वर्षांच्या मुलाचा बुधवारी (5 मे) दुपारी पाण्यात बुडून मृत्यू झाला. समीर राहूल वाघमारे असे बंधाऱ्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
मराठवाडी धरणातून तात्पुरता विसर्ग थांबवून रात्री उशीरापर्यंत नदीपात्रात त्याचा शोध घेण्यात आला. परंतु, पाऊस आणि अंधारामुळे अडथळे आल्याने शोध मोहिम थांबविण्यात आली. आज (6 मे) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास समीरचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला.
ढेबेवाडी खोर्यातील मराठवाडीच्या नवीन गावठाणात वाघमारे कुटुंब वास्तव्यास आहे. या कुटुंबातील 10 वर्षांचा समीर हा दुपारी मराठवाडी धरणाजवळच्या वांग नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्यात पोहण्यासाठी गेला होता. त्यावेळी तेथे अन्य मुलेही पोहत होती. सध्या मराठवाडी धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कोल्हापूर पध्दतीचा बंधारा तुडुंब भरला आहे. या बंधार्यात पोहताना समीर बुडाला. ही बाब लक्षात येताच अन्य मुलांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो सापडला नाही. या घटनेची माहिती त्याच्या कुटुंबीयांना कळविली. कुटुंबीयांसह ग्रामस्थांनीही बंधार्याकडे धाव घेतली.