सातारा - जिल्ह्याच्या पाटण, मणदुरे विभागात गेल्या आठवड्यात जोरदार आणि संततधार पर्जन्यवृष्टी झाली होती. तसेच, गतवर्षी आक्टोबर महिन्यापर्यंत लांबलेला पाऊस, या वर्षीचा शिल्लक पाणीसाठा आणि उन्हाळ्यात दोन वेळा झालेल्या वळीव पावसामुळे मणदुरे विभागातील साखरी-चिटेघर लघुपाटबंधारे प्रकल्प शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यातून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे केरा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होत आहे. तालुक्यातील इतर धरणांपैकी साखरी-चिटेघर धरण हे प्रथमच भरल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मुबलक पावसामुळे, आजच्या परिस्थितीत साखरी-चिटेघर धरणात 3 हजार 899.22 सहस्त्र घनमीटर पाणीसाठा असून 2048.65 उपयुक्त जलसाठा आहे. तर, 1 हजार 444.32 सहस्त्र घनमीटर अचल पाणीसाठा असून संचय पातळी 612 मीटर आहे. तर धरणाची लांबी 395 मीटर इतकी आहे. साखरी-चिटेघर धरण पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यातून पाणी वाहत असल्याने केरा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. दरम्यान, हे धरण भरले असले तरी ज्या शेतकऱ्यांनी धरणासाठी जमिनी दिल्या. पर्यायी जमिनी मिळण्यासाठी शासनाकडे 65 टक्के रक्कम भरली. आता यापैकी 39 खातेदारांनी शासनाकडे पर्यायी जमिनीऐवजी शासनाच्या नवीन धोरणानुसार सव्वा चारपट रक्कम मिळावी, असा प्रस्ताव पाठविला आहे. तो गतवर्षी 26 मार्च 2019 पासून मंत्रालयात जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांकडे धुळखात पडला आहे. याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी मंत्रालयस्तरापर्यंत पाठपुरावा करून अद्याप कोणतीही हालचाल न झाल्याने प्रकल्पग्रस्तांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नवीन झालेल्या महाविकास आघाडी सरकारचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील व गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे या मागण्यांचे निवेदन दिले. मात्र, त्यावेळेपासून लॉकडाऊन सुरू झाल्याने कोणतीही हालचाल झाली नाही. संबंधित मंत्री याबाबत पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय देतील अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत.