सातारा : Sadabhau Khot :सरकारनं 'इंडिया'तून बाहेर येऊन 'भारता'कडं बघावं. भारताला जर बरोबर घ्यायचं असेल तर भारतातल्या जनतेकडं सरकारला लक्ष द्यावं लागेल. तरच इंडियाचा पराभव होऊ शकतो. अन्यथा इंडिया तुम्हाला जड जाईल, असा घरचा आहेर माजी पणन राज्यमंत्री तथा आमदार सदाभाऊ खोत यांनी सरकारला दिला आहे. तसेच प्रस्थापितांशी लढण्याची धमक असणार्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दाबण्यासाठीच सध्या राजकीय घुसळण सुरू असल्याचा (Sadabhau Khot On Government) आरोपही त्यांनी केला आहे.
फडणवीसांना दाबण्यासाठीच राजकीय घुसळण : कराडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, गावगाड्यापर्यंत सरकार पोहचविण्यात देवेंद्र फडणवीस हे अग्रभागी होते. त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला आश्वासक चेहरा मिळाला होता. दुर्दैवानं शिवसेना वेगळी झाली आणि फडणवीसांचा आश्वासक चेहरा संपुष्टात आला. त्यांच्या सारखा चेहरा आज महाराष्ट्राला मिळू शकला नाही. प्रस्थापितांविरोधात लढण्याची धमक महाराष्ट्रात केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आज जी घुसळून सुरू आहे, ती देवेंद्र फडणवीस यांना दाबण्यासाठीच आहे, असा आरोपही त्यांनी केला.
राज्याचा पणन मंत्री कोण, हेच माहिती नाही : महाराष्ट्रासारख्या कृषी प्रधान राज्याला पणन मंत्री नेमका कोण आहे, हे मला पण माहिती नाही. पणन मंत्री कोण आहे, ते विचारावं लागतं, अशी आज राज्यातली परिस्थिती असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. शेतकर्यांसाठी आणि शेतीमालाच्या मार्केटिंगसाठी पणन मंत्री काय करत आहेत, हे एकदा पणनमंत्र्यांनी पुढे येऊन सांगावं. त्यानिमित्तानं पणन मंत्री कोण आहे ते तरी राज्याला समजेल, असा उपरोधिक टोलाही खोत यांनी लगावला.
भंगाराच्या भावात ऊस खरेदीचा डाव : उसाच्या बाबतीत शेतकर्यांनी घाईगडबड करू नये. यावर्षी उसाची कांडी ही सोन्यासारखी आहे. भंगाराच्या भावात ऊस खरेदी करण्याचा कारखानदारांनी डाव आखला असल्याचा आरोप खोत यांनी केला. गेल्या वर्षी गळीत झालेल्या उसाला 200 रुपये शेतकर्यांना दिवाळीत द्यावेत, अशी रयत क्रांती संघटनेची मागणी आहे. तसेच आता गळीतास जाणार्या उसाला एफआरपी अधिक 500 रुपये, असा पहिला हफ्ता शेतकर्यांना देण्याची मागणी सदाभाऊ खोत यांनी केली.