कराड (सातारा) -जम्मू-काश्मिरमध्ये कार्यरत असलेले सातारा जिल्ह्यातील कवठे (ता. कराड) गावचे सुपूत्र ब्रिगेडियर सुजित पाटील यांची मेजर जनरल म्हणून पदोन्नती झाली आहे. ते लष्करातील सर्वात युवा मेजर जनरल ठरले आहेत. त्यांच्या पदोन्नतीने मसूर-कवठे गावांसह सातारा जिल्ह्याचा ऊर अभिमानाने भरून आला आहे.
कराड तालुक्यातील मसूर या बाजारपेठेच्या गावापासून पश्चिमेकडे पाच किलोमीटर अंतरावरील कवठे गावचे सुपूत्र असलेले सुजित पाटील लष्करात ब्रिगेडियर पदावर कार्यरत होते. त्यांची नुकतीच मेजर जनरल म्हणून पदोन्नती झाली आहे. सुशिक्षित कुटुंबातील सुजित पाटील यांचे संपूर्ण शिक्षण पुणे येथे झाले आहे. चुलत्यांपासून त्यांच्या कुटुंबाला लष्करी सेवेची पार्श्वभूमी आहे. त्यांचे चुलते दिवंगत डी. आर. पाटील हे काही काळ लष्करात होते. अपघातामुळे त्यांना लष्करी सेवेतून निवृत्ती घ्यावी लागली होती.
अनेक बटालियनचे केले नेतृत्व
सुजित पाटील यांचे शालेय शिक्षण पुण्यातील विद्या भवन हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर फर्ग्युसन कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून ते एनडीएत दाखल झाले. 1986 मध्ये एनडीएचे शिक्षण पूर्ण करून डेहराडूनच्या इंडियन मिलिटरी अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षणासाठी दाखल झाले. प्रशिक्षणानंतर 1989 मध्ये ते जम्मू-काश्मिर रायफल्स रेजिमेंटमध्ये रूजू झाले. सर्व प्रकारच्या भूभागात त्यांनी सेवा बजावली. ईशान्य भारतातील सर्वाधिक उंचीवरील सेवेचा त्यांना दिर्घ अनुभव आहे. लडाख स्काऊट बटालियन, इन्फन्ट्री ब्रिगेडचे यशस्वी नेतृत्व करतानाच लष्कराच्या मुख्यालयात देखील त्यांनी सेवा बजावली आहे. एनडीएमधील पायाभूत सुविधांचा विकास, विद्यार्थ्यांच्या सुविधांमध्ये वाढ करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर होती.
कोविड काळातही भरीव कामगिरी
कोविडच्या संकटकाळात एनडीएची अॅकॅडमी सुरू ठेऊन 2 हजार विद्यार्थ्यांसह स्टाफच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडली. पुणे महापालिका आयुक्त रूबल अगरवाल आणि एनजीओच्या मदतीने एनडीएमध्ये कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिम राबविण्यात त्यांची भूमिका महत्वाची होती. कॅप्टन एस. एस. वैद्य (नौदल), डॉ. समीर जोशी, डॉ. मेधा ताडपत्रीकर यांच्या सोबत त्यांनी क्लीन एनडीए, ग्रीन एनडीए तसेच नाम फाऊंडेशन, ग्रीन थंब यांच्या सहकार्याने एनडीएत पर्यावरण रक्षणाचे देखील उपक्रम राबविले आहेत.