सातारा : शिक्षणासाठी धरणाच्या पाण्यातून होडी चालवत, खिरखंडी गावातील मुलांना शाळेला जावे लागत होते. उच्च न्यायालयाने (High Court Order) त्यांची दखल घेतल्यानंतर, नूतन जिल्हाधिकारी (Collector) रूचेश जयवंशी यांनी प्रशासकीय अधिकार्यांसमवेत खिरखिंडी गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी पाण्यातून होडी चालवत शाळेत जाणाऱ्या, विद्यार्थ्यांची आश्रमशाळेमध्ये राहण्याची आणि शिक्षणाची व्यवस्था केली आहे. तसेच ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा (Rehabilitation of Khirkhandi village) आठ दिवसांत निर्णय घेणार असल्याचे, देखील जिल्हाधिकार्यांनी सांगितले.
पुनर्वसनानंतरही सहा कुटुंबांचे खिरखिंडीतच वास्तव्य :जावळी तालुक्यातील खिरखिंडी गावामध्ये पूर्वी 70 कुटुंबे वास्तव्यास होती. कोयना धरणाच्या निर्मितीमुळे या गावाचे ठाणे जिल्ह्यातील एकसाल सागाव (ता. भिवंडी) येथे पुनर्वसन झाले. तथापि, पुनर्वसनानंतरही 7 कुटुंबांनी जमिनीचा ताबा घेतला नाही. त्यानंतर, केवळ एका कुटुंबाने जमिन ताब्यात घेतली. त्यामुळे सहा कुटुंबातील लोक आजही खिरखंडीतच वास्तव्यास आहेत. यामुळे या कुटुंबातील मुलांना, धरणाच्या पाण्यातून स्वत: होडी चालवत शाळेला जावे लागत होते. विद्यार्थ्यांच्या या जीवघेण्या प्रवासाची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत, प्रशासनाला उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते.