सातारा - महाबळेश्वरच्या घनदाट, सदाहरित जंगलात कुमठे या गावाजवळ ब्लॅक पँथरने स्थानिक गुराख्यांना दर्शन दिले. सुमारे पाच मिनिटं हा बिबट्या दृष्टीस पडला. नंतर तो जंगलात निघून गेला. कुमठे गावच्या हद्दीत असलेल्या सुभाष नारायण जाधव यांच्या मालकीच्या शेतामध्ये रवींद्र जाधव व सुभाष जाधव हे दोन युवक गाई चारण्यासाठी घेऊन गेले होते. त्यांना तेथे काळा बिबट्या अर्थात ब्लॅक पँथर दिसला. ब्लॅक पँथरचा वावर हाच दिवसभर परिसरात चर्चेचा विषय झाला असून हे शेत गावापासून १५ मिनिटांच्या अंतरावर आहे. वस्तीजवळ बिबट्या आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हे ही वाचा -अखेर राज कुंद्राला जामीन मंजूर, अडीच महिन्यानंतर घेणार मोकळा श्वास
काळा बिबट्या वेगळी जमात नाही -
साताऱ्याचे मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे यांनी सांगितले कि, "काळा बिबट्या ही बिबट्याची वेगळी जात नसते. कालिकण (मेलॅनीन) हे त्वचेतील रंगद्रव्य (पिगमेंट) जास्त प्रमाणात तयार झाल्यामुळे हे बिबटे काळे दिसतात. तर पांढऱ्या वाघाचा पांढरा रंग कालिकणाच्या अभावामुळे असतो. काळ्या बिबट्यांची त्वचा जवळून पाहिली असता, नेहमीचे ठिपके दिसतात. काळे बिबटे हे दाट जंगलांमध्ये जास्त असतात. तिथे त्यांना त्यांच्या रंगाचा फायदा होतो असे मानले जाते. काळा बिबट्या ही वेगळी जात नसल्यामुळे त्याच्या सवयी नेहमीच्या बिबट्यांप्रमाणेच असतात. बिबट्याच्या मादीला होणाऱ्या पिलांपैकी एखादे काळ्या रंगाचे असू शकते. वयाच्या दीड वर्षापर्यंत पिले स्वतंत्र शिकार करू लागतात. वन्यावस्थेत काळे बिबटे 11 वर्षांपर्यंत, तर प्राणीसंग्रहालयात 20 वर्षांपर्यंत जगत असल्याच्या नोंदी आहेत. बाकी सर्व सवयी बिबट्याच्याच आणि खाद्यही तेच असल्यामुळे रंग वगळता, काळा बिबट्या आणि नेहमीचा बिबट्या यांच्यात काहीही फरक नाही.