सातारा- यंदाच्या वर्षी पावसाळ्याचा सुरूवातीलाच, दुष्काळी पट्ट्यात बऱ्यापैकी मोसमी पाऊस झाला. मागील सात-आठ दिवसात झालेल्या दमदार पावसाने कोरेगाव, फलटण, माण, खटाव या परिसरातील शेतकरी सुखावला आहे. या पावसामुळे शेतीच्या कामाला वेग आला असून खरीपाच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात होत आहे.
कोरेगाव, फलटण, माण, खटाव हा परिसर दुष्काळी पट्टा समजला जातो. दरवर्षी या परिसरात टँकरने पाणी पुरवठा करावा लागत असे. पण मागील दोन वर्षांपासून पाणी फाँऊडेशनच्या माध्यमातून या परिसरात जलसंधारणाची कामे झाली आहेत. लोकसहभागातून पाणी अडविण्याचे काम झाल्याने यंदाच्या वर्षी या परिसरात बऱ्यापैकी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. अशातच आर्द्रा नक्षत्राचा शेतीपूरक भिज पाऊस झाल्याने खरीप हंगामाच्या पेरणीचा प्रश्न मार्गी लागला आहे.
दुष्काळी पट्यातील या भागात कमी पाण्यात येणारी मूग, मटकी, बाजरी, कांदा, भुईमूग, मका ही नगदी पिके घेतला जातात. सद्या वेळोवेळी होणाऱ्या पावसाने दुष्काळी माण खटाव शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने, यावर्षी सिताफळ, आंबा, चिकू, पेरू अशा फळ बागा लागवडीकडेही माण-खटावमधील शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.