सातारा: सेल्फी काढताना नेहमी काळजी घेण्याचा पर्यटकांना सल्ला दिला जातो. या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमधील केट्स पाँईंटवरून सेल्फी घेताना पर्यटक महिला दरीत कोसळली. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला. अंकिता सुनिल शिरसकर (वय २३), असे तिचं नाव आहे. महाबळेश्वर आणि सह्याद्री ट्रेकर्सच्या टीमने रात्री महिलेचा मृतदेह दरीतून वर काढला.
रेल्वेमध्ये लोको पायलट (चालक) असलेले सुनील ज्ञानदेव शिरस्कर (वय ३०, रा. उंबरेगव्हाण, ता. जि. धाराशिव, सध्या रा. धनकवडी, पुणे) आणि पत्नी अंकिता हे पर्यटक दाम्पत्य दोन दिवसांसाठी दुचाकीवरून महाबळेश्वर पर्यटनासाठी गेले. मात्र, हे आनंदाचे क्षण शिरस्कर कुटुंबासाठी दु:खाचे क्षण ठरले.
सेल्फी घेणे जीवावर बेतले -महाबळेश्वरला पर्यटनासाठी आल्यानंतर केटस् पॉईंटवरून सेल्फी घेणे विवाहित महिलेच्या जीवावर बेतलं. सेल्फी घेताना तोल जाऊन तीनशे फूट खोल दरीत पडल्यानं महिलेचा जागीच मृत्यू झाला. अंकिता शिरसकर ही विवाहिता पतीसोबत पुण्याहून महाबळेश्वरला दुचाकीवरून पर्यटनाला आली होती. या घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर आणि सह्याद्री ट्रेकर्सची टीम घटनास्थळी पोहोचली.
- ट्रेकर्सनी मृतदेह दरीतून वर काढला-महाबळेश्वर आणि सह्याद्री ट्रेकर्सच्या टीमने तातडीनं बचाव कार्यास सुरुवात केली. दरीत उतरून शोध घेतला असता ३०० फूट खोल दरीत पर्यटक महिलेचा मृतदेह आढळून आला. ट्रेकर्सनी तिचा मृतदेह दरीतच पॅक करून रात्री साडेसातच्या सुमारास वर आणला. मृत पर्यटक महिला ही नवविवाहित होती.