सातारा- मोदींना परदेश पर्यटन आवडते, तर सीबीआय, ईडीच्या माध्यमातून कोणाला तुरुंगात टाकायचे ते अमित शाह ठरवतात, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी-शाहांवर केली. कराड दक्षिणमधील वडगाव हवेली गावात झालेल्या प्रचार सभेत पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. यावेळी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील महाआघाडीचे उमेदवार श्रीनिवास पाटील उपस्थित होते.
यावेळी चव्हाण म्हणाले, की आम्हा दोघांनाही प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. मी मुख्यमंत्री आणि श्रीनिवास पाटील यांनी राज्यपालपदावर काम केले आहे. उमेदवारांच्या क्षमतेचा तुलनात्मक अभ्यास करून कोण विकास करू शकतो, लोकांचे प्रश्न सोडवू शकतो, हे जनतेने ओळखले आहे. त्यामुळे जनताच योग्य निर्णय घेईल. उदयनराजेंनी खासदार असताना 10 वर्षात जनतेची कोणती कामे केली? त्यांना निवडून दिल्यामुळे 10 वर्षे वाया गेली. म्हणून लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्ष महाआघाडीचे विकासाभिमुख उमेदवार श्रीनिवास पाटील यांना सर्वानी साथ देण्याचे आवाहन चव्हाण यांनी केले.